>> अश्विन बापट
घराशी आपलं गहिरं नातं असतं. म्हणूनच घराचं आपल्या पसंतीचं रंगरूप साकारताना ‘रंगशलाका’ची निवड योग्य ठरते, जे घराला समाधानाचा ‘रंग’ बहाल करतं.
घर असावे घरासारखे, नकोत नुसत्या भिंती, तिथे असावा प्रेमजिव्हाळा नकोत नुसती नाती. या काव्यपंक्तींनी घराचं महत्त्व अधोरेखित केलंय. अशाच घराचं रंगरूप आपल्या पसंतीचं साकारण्यासाठी उद्योजक आनंद शेटय़े आणि त्यांची टीम गेली 32 वर्षे मेहनत घेतेय. घरांसाठी तसंच व्यावसायिक आस्थापनांसाठी रिस्टोरेशन, रिपेअर्स आणि रंगकाम अशी तिहेरी जबाबदारी त्यांची टीम करते. इतकंच नव्हे तर वॉटर हार्वेस्टिंग तसंच सोलर पॅनेलसारख्या कामांची प्रोजेक्ट्सही ते उत्तम पार पाडतात. त्यांच्या या प्रवासाविषयी त्यांना बोलतं केलं असता ते म्हणाले, मी मूळचा कोकणातल्या सावंतवाडीच्या दोडामार्गच्या खानयाळे गावचा. इथे मुंबईत करीअर घडवण्यासाठी आलो. या महानगरीची हळूहळू ओळख करून घेऊ लागलो. मग 1984 ते 1992 अशी आठ वर्षं एका बिल्डरकडे साइटवर नोकरी केली. तेव्हाच मनाशी ठरवलं की, याच क्षेत्रात काहीतरी करायचं जे स्वतःचं असेल. माझ्या कंपनीचं पहिलं पाऊल पडलं. त्याला ‘रंगशलाका’ असं समर्पक नाव दिलं. अरविंद परब यांनी माझ्या कंपनीचा लोगो डिझाइन केला तेव्हा त्यांनी मला सांगितलं, या लोगोमधील मोरासारखा तुमचा व्यवसाय ताठ मानेने उभा राहील. 11 वाजता त्यांनी मला हे सांगितलं आणि दोन तासांतच या गुणी कलाकाराचं निधन झालं. त्यांची एक्झिट मला चटका लावून गेली. त्यानंतर मी माझा लोगो कधीच बदलला नाही. या लोगोमधल्या विविध रंगांप्रमाणे लोकांच्या जीवनातही अशाच सुख, समृद्धी, आनंदाच्या रंगांची उधळण होवो, असाच माझा नेहमी प्रयत्न असतो.
मुंबईमध्ये बोरिवलीत माझं ऑफिस आहे. जिथे कायमस्वरूपी 12 कर्मचारी आहेत, तर सुमारे 150 कामगारांची टीम प्रोजेक्टनुसार कमी-जास्त होत असते. मी आतापर्यंत 32 वर्षांमध्ये 300 प्रोजेक्ट्स केलीत, तर सुमारे आठ हजार घरांचं रंगकाम केलंय. मुंबईशिवाय ठाणे, कळवा यांसारख्या ठिकाणीही मी प्रोजेक्ट्स केलीत. तसंच गोव्यातही काही प्रकल्पांवर मी काम केलंय. तिथेही माझी टीम कार्यरत आहे. घरांना, लॉबीला, इमारतीला रंग देताना नुसतं कलर कॉम्बिनेशन सिलेक्ट करून मी तो देत नाही, तर त्यामध्ये लोकांच्या आवडीनुसार सकारात्मक संदेश देणारी चित्र असतात, तंदुरुस्त राहण्याचा संदेश देणाऱया योगमुद्रा असतात, तर नव्या पिढीच्या आवडीप्रमाणे कम्पाऊंड वॉलला सेल्फी पॉइंट्सही काही ठिकाणी आम्ही करून दिलेत. हा सारा माझा प्रवास मला बरंच काही शिकवून गेलाय. तो मी शब्दातूनही मांडतोय. माझं एक पुस्तक ‘मुक्काम पोस्ट खानयाळे’ प्रकाशित झालंय, तर ‘नसते उद्योग’ नावाचं दुसरं पुस्तक प्रकाशनाच्या वाटेवर आहे. ज्यामध्ये मी आतापर्यंत जे अनुभव या क्षेत्रात घेतलेत, त्या अनुभवांचा संग्रह त्यात नमूद आहे. यातला एक अनुभव तुम्हाला सांगतो, एकदा एका प्रोजेक्टमध्ये माझा तोटा झाला. साहजिकच मला वाईट वाटलं. तेव्हा एका व्यक्तीने मला समजावलं. ते म्हणाले, आनंदजी या व्यवसायात सिंगल प्रॉफिट किंवा डबल प्रॉफिट असतं. तेव्हा मी त्यांना विचारलं, तुम्हाला नेमकं काय म्हणायचंय, तर ते म्हणाले, सिंगल प्रॉफिट म्हणजे अनुभव आणि डबल प्रॉफिट म्हणजे अनुभव व त्या प्रोजेक्टमधला फायदा. या प्रोजेक्टमध्ये अनुभवाने तुमचा खिसा भरलाय. जगण्याकडे पाहण्याचा असा सकारात्मक दृष्टिकोन देणारी अनेक माणसं मला या वाटचालीत भेटलीत. तसंच काही प्रतिकूल गोष्टीही घडल्यात. अशा अनुभवांचं शब्दचित्र म्हणजे हे पुस्तक आहे.
या व्यवसायात येऊ पाहणाऱया उद्याच्या उद्योजकांना तुम्ही काय सांगाल, यावर आनंदजी म्हणाले, या व्यवसायात प्रचंड स्कोप आहे. फक्त तुमच्या कामगिरीत सातत्य व नवं करण्याचा ध्यास असावा. लोकांचा विश्वास जपता यायला हवा. 15 वर्षांपूर्वीचे क्लाएंट्स अजूनही माझ्याकडूनच काम करून घेतात. तेव्हा सातत्य, विश्वास आणि नावीन्य या त्रिसूत्रीवर तुम्ही वाटचाल करा. नुसत्या पेंटिंग इंडस्ट्रीचा विचार केला, तर 60 हजार कोटींची ही इंडस्ट्री आहे. त्यामध्ये तुम्ही रिस्टोरेशन, रिपेअर्स, सोलर पॅनल या बाबी जर समाविष्ट केल्या, तर एक लाख कोटीच्या वर हा आकडा जातो इतकं प्रचंड मोठं पोटेन्शियल या व्यवसायात आहे. तरी तरुणांनी या व्यवसायाकडे जरूर वळावं असा माझा त्यांना सल्ला राहील.