अंबरनाथमध्ये आढळले जखमी पिसोरी हरीण

अंबरनाथ एमआयडीसीला लागून असलेल्या वनक्षेत्रात दुर्मिळ पिसोरी जातीचे हरीण जखमी अवस्थेत आढळले. ग्रामस्थांनी याबाबतची माहिती वनविभागाला दिल्यानंतर वनाधिकारी वैभव वाळिंबे यांनी हरणाला ताब्यात घेऊन पशुवैद्यांच्या मदतीने प्रथमोपचार करून जीवदान दिले. या हरणाला संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरिवली येथे पुढील उपचारासाठी दाखल केले.

अंबरनाथ अतिरिक्त एमआयडीसी परिसरास लागून माथेरान मलंगगडपासून आलेली डोंगररांग आहे. याठिकाणी विस्तीर्ण वनक्षेत्र आहे. संरक्षित वनक्षेत्रात बिबट्या, हरीण, भेकर, माकड, रानडुक्कर, ससे, साप, विविध पक्षी अशा विविध वन्यजीवांचा वावर आहे. रविवारी पहाटे रिलायन्स स्टील ट्यूब या कारखान्यात रात्रपाळीवर असणाऱ्या कामगाराला डोंगराजवळ जखमी हरीण दिसले. त्याने ग्रामस्थांच्या मदतीने प्राणीमित्र विनय पवार व वनविभागाशी संपर्क केला.

वनविभागाने घेतले ताब्यात

तातडीने वनपरिमंडळ अधिकारी वैभव वाळिंबे यांनी दुर्मिळ पिसोरी हरणास ताब्यात घेऊन उपचारासाठी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रायबोळे यांच्याकडे नेले. प्रथमोपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी वनपरिक्षेत्र अधिकारी संजय चने यांच्या मार्गदर्शनाखाली संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरिवली येथे हरणाला दाखल केले.