मीरा-भाईंदरमध्ये जानेवारीपासून ऑर्डर ऑर्डरऽऽऽ असा न्यायालयाचा आदेश घुमणार आहे. हटकेश परिसरात दिवाणी व फौजदारी न्यायालय सुरू होणार असल्याने वकील व अशील यांची ठाण्यापर्यंत होणारी फरफट थांबेल. न्यायालयाची इमारत बांधून तयार असून कामकाजासाठी आवश्यक असलेल्या १६ पदांना विधी विभागाने मंजुरी दिली आहे. मीरा रोडमध्ये नवे दिवाणी व फौजदारी न्यायालय सुरू होत असल्याने खटल्यांचा निपटारा जलदगतीने होईल, असा विश्वास व्यक्त होत आहे.
मीरा-भाईंदरमधील लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असून या भागातील खटले चालवण्यासाठी न्यायालय तसेच अशिलांना ठाण्यामध्ये यावे लागायचे. त्यामुळे बराच वेळ वाया जायचा. आता मीरा रोडमध्येच दिवाणी न्यायालय (कनिष्ठ स्तर) व न्यायदंडाधिकारी (प्रथम वर्ग) न्यायालय सुरू होणार असून त्यास विधि व न्याय विभागाने मंजुरी दिली आहे. न्यायालयाच्या कामकाजासाठी दोन मजली इमारत बांधून सज्ज आहे तर न्यायाधीशांच्या निवासस्थानाचे कामही अंतिम टप्प्यात आहे.
मीरा रोडमधील न्यायालयाकरिता दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर), न्यायदंडाधिकारी (प्रथम वर्ग), १ सहाय्यक अधीक्षक, १ लघुलेखक, दोन वरिष्ठ लिपिक, चार कनिष्ठ लिपिक, ३ बेलिफ अशी एकूण १२ पदांना मंजुरी देण्यात आली आहे. तर दोन शिपाई, एक पहारेकरी व एक सफाई कामगार ही चार पदे आऊटसोर्सिंगद्वारे भरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मीरा रोडमध्ये नव्याने न्यायालय सुरू करावे, अशी वकिलांची गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी यानिमित्ताने पूर्ण झाली आहे.
विधिमंडळाची अंतिम मंजुरी लागणार
मीरा रोडमधील न्यायालय पुढील वर्षी जानेवारी महिन्यात सुरू होत असून त्यासाठी आवश्यक असलेली यंत्रणा सज्ज होत आहे. याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला असून नव्या न्यायालयासाठी विधिमंडळाची अंतिम मंजुरी घ्यावी लागेल. निवडणुका झाल्यानंतर होणाऱ्या पहिल्याच अधिवेशनात मंजुरी दिली जाणार आहे.