मनतरंग- तुमचं आमचं सेम नसतं

>> दिव्या नेरुरकर-सौदागर

मानसशास्त्राीय भाषेतील ‘प्रोजेक्शन’ ही एक प्रकारची मानसिक अवस्था असते ज्यामध्ये अर्धज्ञात मन काही वेदनादायक गत आठवणी, माणसे यांच्यापासून उत्पन्न झालेल्या तणावापासून स्वतचे संरक्षण करण्यासाठी संरक्षण यंत्रणा उभारते. ज्यायोगे व्यक्ती तणाव, दुःख किंवा नकोशा आठवणींपासून काही काळ बचाव करते. ही सामान्य प्रक्रिया जरी असली तरी त्यापासून बरीच उलथापालथ होऊ शकते आणि नात्यांमध्ये तणाव उत्पन्न होऊ शकतो.

मंदार आणि त्याचा मुलगा रोहनचे काही महिन्यांपासून बिनसत चालले होते आणि मंदारचा रोहनच्या बाबतीतला बदल म्हणजेच त्याची रोहनवर होणारी सततची चिडचिड, रोहनचा पाणउतारा करणे हे चित्राला (तिघांची नावे बदलली आहेत) त्याच्या बायकोला दिवसेंदिवस अस्वस्थ करून जात होते.

रोहन फक्त सात वर्षांचा होता आणि लहानपणापासूनच तसा बुजरा. त्याचे बुजरेपण हे मंदारला खटकायचे. खटकायचे म्हणण्यापेक्षा त्याला रागच यायचा. कारण तो स्वत भरपूर लोकांमध्ये मिसळायचा. या उलट रोहन बाहेर कुठेही गेला की, चित्राच्या पाठी लपायचा. त्याचा शाळेत एकच मित्र होता. बाकी मुलांमध्येही तो फारसा रमत नसे. याउलट मंदार आणि चित्राचा मित्रपरिवार खूप मोठा होता. हल्ली रोहन कोणाकडेही जायचे असल्यास आजारी पडायला लागला होता आणि मंदारचा मूड ऑफ व्हायला लागला होता. त्या दिवशीही असेच घडले.

“काय याची नेहमीची नाटकं आहेत?’’ डॉक्टरांकडे जाऊन आल्यावर मंदार रोहनवर भडकला. रोहन आजारी पडला होता आणि बाहेर जाता आले नाही म्हणून मंदार चिडला होता. “माझा आनंद या काटर्य़ाला बघवत नाहीच. खो घालतच राहतो नेहमी. याचा जन्म…’’

“तिथेच थांब. बोलू नकोस पुढे,’’ चित्रा ओरडली आणि रोहनला आत घेऊन गेली. मंदारसुद्धा रागारागात घराबाहेर पडला आणि रोहन बिचारा पप्पांचा रुद्रावतार पाहून पार घाबरून गेला होता. चित्राने त्याला बेडवर बसवले आणि खायला घेऊन आली. तेव्हा त्याने तिला नकार दिला व म्हटले, “माझ्याकडून मोठी चूक झाली आहे आई. त्याची शिक्षा मला व्हायलाच पाहिजे. मला आज भुकेलं राहू देत,’’ असे म्हणून त्याने तोंड वळवले आणि रडू लागला. मंदार खूप उशिराने घरी आला आणि त्याने मोठय़ा मायेने रोहनच्या कपाळावरून हात फिरवला आणि हुंदका आवरत खोलीबाहेर आला. मंदारने शांतपणे समुपदेशन सत्रात वरील घटना सांगितली.

“आमचा एकुलता एक मुलगा आहे आणि खरोखर साधा, सरळ आहे. पण तरीही हा त्याचा राग राग इतका करतो की, आता हा ऑफिसमधून आला की, दबून राहायला लागला आहे.’’ चित्राने त्या दोघांमधला ताण सांगायला सुरुवात केली. “आधी तर हे दोघेही इतके क्लोज होते की, दोघांना एकमेकांशिवाय करमायचं नाही. आता हा घरात आला की, रोहन गुपचूप आपल्या रूममध्ये जाऊन अभ्यास करतो आणि तिथेच खेळत बसतो.’’ एवढे बोलून चित्राने आवंढा गिळला.

“त्याला एक कारण आहे मॅडम.’’ मंदारने आता बोलायला सुरुवात केली. “माझा भाऊ नरेश (नाव बदलले आहे) हासुद्धा असाच होता. भरपूर लाजाळू आणि आत्मविश्वास नसलेला. त्यामुळे त्याला शाळेत आणि पुढे कॉलेजातसुद्धा प्रचंड बुलिंग झालं. इतकं की, शेवटी त्याला शिक्षण सोडावं लागलं. तो खचला. शिक्षण नसल्यामुळे त्याला नोकरी नव्हती. हे सगळं माझ्या आईमुळे झालं. ती त्याला जपत गेली. शेवटी काय? आता तो निव्वळ दहा हजारांची प्युनची नोकरी करतोय. इंजिनीअर बनायची स्वप्नं पाहणारा माझा भाऊ आता कुठल्यातरी ऑफिसात एक बॉय म्हणून काम करतोय. चाळीशी आली तरी लग्न नाही.’’ असं म्हणून मंदार एकदम शांत झाला. “म्हणून मी रोहनला स्ट्राँग बनवतोय.’’

मंदार रोहनबाबत हळवा होता. पण ते हळवेपण तो त्याच्यापर्यंत अयोग्य पद्धतीने पोहोचवत होता. त्याला रोहनला कणखर बनवायचे होते, पण त्यासाठी त्याने साम-दाम-दंड-भेद हा मार्ग पत्करला होता. ज्यामुळे रोहनवर नकारात्मक परिणाम झाला होताच शिवाय बाप-लेकाच्या नात्यालाही तडा जात होता. रोहनचे बुजरेपण, परक्यांबरोबर रमायला वेळ घेणे हे सगळे मंदारने वेगळ्या अर्थाने घेतले (माझा भाऊही असाच होता) आणि म्हणूनच त्याच्याकडूनही त्याच चुका घडत होत्या ज्या त्याच्या वडिलांकडून नरेश बाबतीत घडल्या होत्या. तोही आपल्या वडिलांसारखा त्याच्याबरोबर कडक राहायला लागला.

मानसशास्त्राय भाषेत याला ‘प्रोजेक्शन’ असे म्हटले जाते. ही एक प्रकारची मानसिक अवस्था असते. ज्यामध्ये अर्धज्ञात मन (subconscious mind) काही वेदनादायक गत आठवणी, माणसे यांच्यापासून उत्पन्न झालेल्या तणावापासून स्वतचे संरक्षण करण्यासाठी संरक्षण यंत्रणा (Defence Mechanism) उभारते. ज्यायोगे व्यक्ती तणाव, दुःख किंवा नकोशा आठवणींपासून काही काळ बचाव करते. ही सामान्य प्रक्रिया जरी असली तरी त्यापासून बरीच उलथापालथ होऊ शकते आणि नात्यांमध्ये तणाव उत्पन्न होऊ शकतो. असाच ताण मंदारच्या आणि रोहनच्या नात्यामध्ये तयार झालेला होता व त्याचे परिणाम चित्राला जास्त दिसत होते.

कुटुंब समुपदेशन मंदारसाठी आवश्यक होते आणि तशी सत्रे सुरू झाली. ज्यामध्ये सुरुवातीला मंदारला त्याच्या भूतकाळातील काही अप्रिय घटनांबद्दल (नरेशचे बालपण, त्याच्या मानसिक समस्या आणि त्याचा मंदारवर झालेला परिणाम) बोलते केले गेले. त्यावरून त्याचे बरेचसे ताण आणि नैराश्यही बाहेर आले. तसेच त्याला भविष्याबद्दल वाटत असलेली अनामिक भीती आणि चिंता यावरही समुपदेशन केले गेले. मंदार रोहनबाबतीत कमालीचा सजग होता आणि त्यातूनच त्याचा ‘कडक शिस्तीचा पालक’ डोकावत होता जो फक्त चिंतेमधून तयार झालेला होता. त्यासाठी ‘अनाठायी चिंता’ या भावनेचे व्यवस्थापन काही सत्रांतून करण्यात आले.

त्यानंतर वैयक्तिक सत्रांतून रोहन आणि चित्राचे ताण व्यवस्थापन आणि रोहनकरिता विशेषकरून व्यक्तिमत्व विकासासाठी मार्गदर्शन करण्यात आले. त्याच्या जोडीला मंदार आणि रोहनची एकत्रित सत्रे घेतली गेली. हेतू हाच की, रोहनची ‘पप्पाबद्दलची भीती’ जावी आणि ती दोघं जास्तीत जास्त जवळ यावीत. परिणाम दिसायला लागला होता जेव्हा सत्रांसाठी ती दोघंही एकत्र येऊ लागली आणि नंतर लाँग ड्राईव्ह करून घरी जाऊ लागली. रोहनचे आजारी पडणे जवळ जवळ नाहीसे झाले होते. कारण मंदार आता रोहनच्या स्पेसने वागत होता आणि त्याला खुलायला, इतरांशी मैत्री करायला ‘त्याचा’ वेळ देत होता.

 [email protected]
(लेखिका मानसोपचारतज्ञ व समुपदेशक आहेत)