>> प्रसाद ताम्हनकर
नव्या शतकात विज्ञान, तंत्रज्ञान, अवकाश, उच्च शिक्षण अशा अनेक क्षेत्रांत भरारी मारत असलेल्या हिंदुस्थानला जगभरात सर्पदंशाची राजधानी (Snake Bite Capital of the World) अशी दुर्दैवी ओळखदेखील मिळाली आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या एका अहवालानुसार जगभरात दरवर्षी 80 हजार ते 1 लाख 30 हजार लोकांचा सर्पदंशाने मृत्यू होतो. एकटय़ा हिंदुस्थानात ही संख्या दरवर्षी 58 हजाराच्या आसपास असते. या दुर्दैवी आकडेवारीमुळे देशाला ही नकोशी उपाधी प्राप्त झाली आहे. बिहार राज्याच्या हेल्थ मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टीमच्या आकडेवारीनुसार एप्रिल 2023 ते मार्च 2024 या कालावधीत तब्बल 17 हजार 859 रुग्णांना सर्पदंशामुळे दवाखान्यात उपचारासाठी आणण्यात आले होते आणि त्यापैकी 934 रुग्णांचा मृत्यू झाला. बिहारमध्ये सातत्याने वाढ होत असलेल्या सर्पदंशाच्या घटनांमुळे वैद्यकीय सुविधांचा अभाव, ग्लोबल वॉर्मिंग, दळणवळणाच्या साधनांची कमतरता, अंधश्रद्धा असे अनेक प्रश्न चर्चेत आले आहेत.
बिहारमधील बेलागोटसारखी काही गावे ही चारी बाजूंनी नदीच्या पाण्याने वेढलेली आहेत. दळणवळणाचे एकमेव साधन म्हणजे होडी. होडीतून नदी पार करून किनाऱयापर्यंत पोहोचल्यावरदेखील तिथून दवाखान्यापर्यंत जाण्याचा रस्ता तीन ठिकाणी तुटलेला आहे. जोडीला मोठय़ा प्रमाणावर असलेली अंधश्रद्धादेखील संकटात अजून भर घालते आहे. सर्पदंश झाल्यावर रुग्णाला तातडीने वैद्यकीय इलाजासाठी न नेता ओझा, भगत, पुजारी अशा लोकांकडे मदतीसाठी धाव घेतली जाते. एखाद्या देवळात रुग्णाला नेल्यास त्याचे विष उतरते अशा समजुतीतून रुग्णाला देवळात नेऊन झोपवलेही जाते. या सर्व हेळसांडीमध्ये योग्य वेळेत वैद्यकीय उपचार न मिळाल्यानेदेखील मृत्यूच्या प्रमाणात भर पडत आहे.
सर्पदंशाच्या वाढत्या घटनांमागे पूर आणि बदलते हवामान देखील कारणीभूत असल्याचे या क्षेत्रातील तज्ञ सांगतात. सर्पदंशाच्या घटनांमध्ये पावसाळ्यात आणि त्यानंतर आलेल्या पुरामुळे मोठय़ा प्रमाणात वाढ होते. पावसाचे वा पुराचे पाणी सापांच्या बिळात शिरते आणि त्यामुळे मोठय़ा प्रमाणावर हे साप जमिनीवर येतात. हवामान बदलाचा गंभीर परिणामदेखील या वेळी स्पष्ट होत आहे. हवामान बदलाने अवकाळी पाऊस, पूर तर कधी दुष्काळाला सामोरे जावे लागत आहे. यामुळे शेतीची प्रचंड हानी होते. पिके नसल्याने त्यावर जगणारे उंदीर व अन्य छोटे प्राणी स्थलांतर करत आहेत आणि त्यामुळे सापांची प्रचंड उपासमार होत आहे. मुख्य म्हणजे मानवाच्या निसर्गातील हस्तक्षेपामुळे सापांचे नैसर्गिक अधिवास वेगाने कमी होत चालले आहेत.
हवामान विषयातील तज्ञ याबद्दल पुढे सांगतात की, हवामानातील बदलामुळे पूर्वी उष्मकाळ (इन्क्युबेशन पीरियड) जो 45 ते 60 दिवसांचा असायचा तो आता 45 ते 50 दिवसांवर आला आहे. साप हा थंड रक्ताचा प्राणी आहे. त्यामुळे पृथ्वीचे वाढत चाललेले तापमान त्याला अधिक आक्रमक आणि हिंसक बनवत आहे. या दुर्दैवी घटनांना तोंड देण्यासाठी बिहारची वैद्यकीय व्यवस्था कितपत सक्षम आहे हा खरा प्रश्न आहे. बिहारमध्ये अनेक डॉक्टर सर्पदंशावर उपचार करण्यासाठी प्रशिक्षित नाहीत. राज्याचे आरोग्य मंत्री मात्र बिहारची आरोग्य सेवा पूर्णपणे सज्ज असल्याचे सांगतात. राज्यातील कोणत्याही ठिकाणाहून 30 मिनिटांच्या आत जवळच्या रुग्णालयात पोहोचता येते असा ते दावा करतात. तसेच प्रत्येक रुग्णालयात सर्पदंशावरील उपचार असलेली अँटी स्नेक व्हेनमदेखील उपलब्ध असल्याचे ते सांगतात.
पुराच्या काळात सरकारतर्फे बोट आम्ब्युलन्स चालवल्या जातात आणि रुग्णांना त्वरेने उपचारासाठी नेण्यात येते. त्याचबरोबर मुख्यमंत्री शाळा सुरक्षा योजनेच्या अंतर्गत मुलांना सर्पदंशाची माहिती देऊन उपचारांच्या संदर्भात जागृती अभियानदेखील चालवले जात आहे. मात्र पिढय़ांन्पिढय़ा रुजलेले चुकीचे समज, अंधश्रद्धा दूर होण्यासाठी बराच कालावधी लागतो याकडेदेखील तज्ञ लक्ष वेधतात. सर्पदंशावरील उपचार अगदी सहजपणे उपलब्ध असले, तरी रुग्णाला योग्य वेळेत उपचारासाठी आणणेदेखील तितकेच महत्त्वाचे आहे असे आरोग्य सेवेतील तज्ञ सांगतात. या वर्षीच्या मार्चमध्ये हिंदुस्थान सरकारने ‘वन हेल्थ’ धोरणाचा अवलंब केला असून 2030पर्यंत सर्पदंशाने होणारे मृत्यू निम्म्यावर आणण्याचे लक्ष्य ठेवले आहे.