लोकसभा निवडणुकीच्या वेळेस राज्यात अनेक ठिकाणी मतदानासाठी रांगा लागल्या होत्या. त्यामुळे अनेक मतदार घराबाहेर पडले नाहीत. त्याचा मतदानाच्या टक्केवारीवर परिणाम झाला. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत मतदानाचा वेग वाढवण्याच्यादृष्टीने कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण द्या, अशी सूचना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने आज केंद्रीय निवडणूक आयोगाला करण्यात आली. राज्यात एकाच टप्प्यात मतदान घ्या, अशी मागणी शिवसेनेने आयोगाकडे केली.
शिवसेना नेते सुभाष देसाई, शिवसेना नेते, खासदार अनिल देसाई यांनी आज मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांची भेट घेऊन निवेदन दिले आणि मतदानाचा टक्का वाढवण्याच्या दृष्टीने अनेक महत्त्वाच्या सूचना केल्या. लोकसभा निवडणुकीच्या वेळेस अनेक ठिकाणी रांगा लागल्या होत्या. मतदान संथगतीने सुरू होते. त्याची पुनरावृत्ती विधानसभा निवडणुकीमध्ये होऊ देऊ नका, अशी सूचना शिवसेनेने आयोगाला केली. लोकसभा निवडणुकीच्या वेळेस मतदारांच्या रांगा लागलेली दृष्ये मतदारांनी टीव्हीवर पाहिले आणि त्यामुळे मतदानाला लागणारा प्रचंड वेळ पाहून अनेक जण मतदानासाठी घराबाहेरच पडले नाहीत. परिणामी मतदान कमी झाले. विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी आणि वेगाने मतदान होण्यासाठी निवडणूक कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण द्या. म्हणजे मतदारांची अशी कुचंबणा होणार नाही. मतदारांचा उत्साह वाढेल, असे शिवसेनेच्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघांत एका किंवा दोन टप्प्यातच मतदान घेण्याची सूचना शिवसेनेने केली. निवडणूक साहित्य, मनुष्यबळ, सुरक्षा व्यवस्था अशी कारणे देऊन मतदान पाच-सहा टप्प्यात घेतले जाते. पण यापूर्वी राज्यात एकाच टप्प्यात विधानसभा निवडणुकीचे मतदान झालेले आहे. त्यामुळे या वेळेसही राज्यात एका किंवा फारतर दोन टप्प्यांत विधानसभा निवडणूक घेण्यात यावी, असे नमूद करण्यात आले. शिवसेनेने केलेल्या सूचनांवर सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिल्याची माहिती सुभाष देसाई आणि अनिल देसाई यांनी दिली.
शिवसेनेच्या सूचना…
मतदान केंद्रावर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही, पंखा नाही, कोंदट जागी मतदान कक्ष अशी स्थिती लोकसभेला राज्यात अनेक ठिकाणी दिसली. विधानसभेला या त्रुटी दूर करून सोयीसुविधांनी सज्ज अशी मतदान केंद्रे उभारा.
आधार कार्ड दाखवले तरी आणखी पुरावे मतदारांकडे मागितले जातात. कोणताही एक ग्राह्य पुरावा अपेक्षित असताना यावरून मतदारांची कोंडी करू नका.
पोलिंग एजंटची अधिकृत नियुक्ती केली जाते. त्याला ओळखपत्र दिले जाते. मात्र मतदान केंद्रावर ठरवून काही पोलिंग एजंटना त्याचे अधिकार दिले जात नाहीत. त्याबाबत योग्य त्या सूचना द्या.
निवडणूक आयोगावर शंका घेता येईल, असे अनेक प्रकार घडतात. ते पाहता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत पारदर्शकपणे आयोगाचे काम होऊ द्या.
n महाराष्ट्रात लोकसभेचे मतदान पाच टप्प्यांत झाले. दिल्लीतल्या भाजप नेत्यांच्या सोयीने निवडणूक घेतली गेली. आता विधानसभेला तरी हे टाळा. निवडणूक उगाच कोणाच्या तरी सोयीनुसार लांबवू नका.
n मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर झाल्यानंतर चार दिवसांनी त्यात बदल कसा केला जातो. टक्केवारीत परत वाढ कशी होते? लोकसभा निवडणुकी वेळी असा प्रकार घडला आणि संशय निर्माण झाला. मतदारही याबाबत साशंक आहेत. असे प्रकार टाळा.
n निवडणूक प्रक्रिया लोकशाही मार्गाने व्हावी. अनेक मतदान केंद्रांवर अधिकारी पक्षपातीपणा करतात. त्याला अटकाव करा.
वादग्रस्त रश्मी शुक्लांना हटवा
राज्यात विधानसभेची निवडणूक निष्पक्षपातीपणे पार पडण्यासाठी वादग्रस्त पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना हटवण्याची मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने मुख्य निवडणूक आयुक्तांकडे केली. रश्मी शुक्ला यांची कारकीर्द संशयास्पद व वादग्रस्त आहे. विरोधी पक्षांच्या नेत्यांना धमकावणे, विरोधी पक्षांच्या नेत्यांचे फोन टॅपिंग करणे यासारखे प्रकार त्यांनी केले असून त्यांच्यावर गुन्हेही दाखल झालेले आहेत. निवडणुका पारदर्शक व निष्पक्षपातीपणे पार पडण्यासाठी त्यांना हटवणे आवश्यक आहे, असे पटोले यांनी नमूद केले.