कश्मीरमध्ये मतदानाचा टक्का वाढला; मग महाराष्ट्रात का नाही? केंद्रीय निवडणूक आयोगाचा राज्याला सवाल

दहशतवाद असलेल्या कश्मीरमधील राजोरी आणि अनंतनागसारख्या जिह्यांमध्ये मतदार नोंदणी आणि मतदान टक्का वाढला, मग महाराष्ट्रात मतदानाचा टक्का का वाढत नाही, अशा शब्दांत मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी आज राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना जाब विचारला. त्याचबरोबर आम्ही आदेश देऊनही अधिकाऱ्यांच्या बदल्यांवर कोणतीही कार्यवाही का केली नाही, अशा शब्दांत राज्याच्या मुख्य सचिवांना जाब विचारला.

मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्या नेतृत्वाखाली पेंद्रीय निवडणूक आयोगाचे पथक तीन दिवसांच्या मुंबई दौऱयावर आले आहेत. या दौऱ्यात त्यांनी विविध राजकीय पक्ष, राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी, गृह विभाग, गुप्तचर संस्था आणि विविध एजन्सीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली.

या वेळी त्यांनी महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीतील घटलेले मतदान आणि मतदान पेंद्रावर झालेल्या गैरसोयीवर नाराजी व्यक्त केली. या वेळी त्यांनी जम्मू-कश्मीर विधानसभा निवडणुकीचे उदाहरण दिले. निवडणूक आयोगाने त्या राज्याचा दौरा केला होता. दहशतवादाचा प्रभाव असलेल्या जिह्यांमध्ये मतदार नोंदणी वाढली होती. जर दहशतवाद प्रभावित जिह्यांमध्ये मतदार नोंदणी वाढते तर मग महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात का मतदार नोंदणी व मतदानाचा टक्का वाढत नाही, अशी विचारणा राज्याकडे केली. मतदार नोंदणी वाढत नसल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली. मतदार बाहेर येत नाहीत ही चिंतेची बाब असल्याचे ते म्हणाले. त्यावर राज्याचे अधिकारी निरुत्तर झाले. अखेर मतदारांसाठी पंखे, वेटिंग रूम, पिण्यासाठी पाणी, मंडप अशा सुविधा वाढवण्याची सूचना केंद्रीय निवडणूक आयोगाने केली.

पंचतारांकित मुक्काम

पेंद्रीय निवडणूक आयोगाची सह्याद्री अतिथीगृहावर बडदास्त ठेवण्याची राज्य सरकारने पूर्ण तयारी केली होती. पण पेंद्रीय निवडणूक आयोगाच्या चौदा ते पंधरा जणांच्या या पथकाने नरीमन पॉइंट येथील ट्रायडंटवर मुक्काम केला आहे. 2019मध्ये पेंद्रीय निवडणूक आयोगाच्या पथकाचा मुक्काम ताजमध्ये होता. पण त्यांनी बैठका सह्याद्रीवर घेतल्या होत्या. या वर्षी मुक्काम व बैठकाही ट्रायडंटमध्ये घेतल्या. शनिवारी संध्याकाळी साडेचार वाजता पत्रकार परिषदही ट्रायडंटमध्ये होणार आहे.

राज्य सरकारवर नाराजी

केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्य सरकारला जानेवारी महिन्यात अधिकाऱ्यांच्या बदल्यांच्या संदर्भात पत्र दिले होते. एकाच जागेवर तीन वर्षांपेक्षा अधिक काळ काम केलेल्या अधिकाऱयांच्या तत्काळ बदल्या करण्याच्या सूचना दिल्या होत्या. या बदल्यांच्या संदर्भात राज्याला तीन वेळा स्मरणपत्र पाठवण्यात आले होते. पण तरीही आयोगाच्या पत्रावर कार्यवाही केली नाही. त्यावर केंद्रीय निवडणूक आयोनाने राज्याच्या मुख्य सचिवांकडे नाराजी व्यक्त केली. राज्यातील 100 पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश देऊनही बदल्या का करण्यात आल्या नाहीत, असा प्रश्न आयोगाने केला. त्यावर बदल्या झाल्यावर पोलीस मॅटमध्ये धाव घेतात, असे स्पष्टीकरण पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी या वेळी दिले.