पंतप्रधान ज्याच्यावर घोटाळ्याचे आरोप करतात त्याला उपमुख्यमंत्री बनवतात, केजरीवाल यांचा अजित पवारांवरून मोदींवर घणाघात

पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्याच्यावर भ्रष्ट्राचाराचे आरोप करतात त्याला उपमुख्यमंत्री बनवतात, असा जोरदार घणाघात दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरून मोदींवर केला आहे.

दिल्ली विधानसभेचे अधिवेशन सध्या सुरू आहे. आज केजरीवाल यांनी पंतप्रधान मोदींवर जोरदार निशाणा साधला. पंतप्रधान मोदी यांनी 27 जून 2023 रोजी जाहीर सभेत बोलताना अजित पवार यांच्यावर 70 हजार कोटींचा घोटाळ्याचा आरोप आहे. आम्ही त्यांना तुरूंगात पाठवू असे सांगितले होते. परंतु पाच दिवसांनी 2 जुलै 2023 रोजी अजित पवार यांना महाराष्ट्रात सरकारमध्ये सामील करून घेतले आणि उपमुख्यमंत्री केले. मला पंतप्रधानांना विचारायचे आहे, ‘तुम्हाला काही लाज वाटते का? तुम्ही घरी जाताना कोणता चेहरा दाखवता? असा हल्लाबोल केजरीवाल यांनी केला.

मी सरसंघचालक मोहन भागवत यांना पाच दिवसांपूर्वी पत्र पाठवून पाच मुद्द्यावर बोललो होतो. त्यातील एक मुद्दा म्हणजे पंतप्रधान मोदी हे ईडी, सीबीआयचा धाक दाखवून किंवा पैशाचे आमिष दाखवून देशातील सर्वात भ्रष्ट नेत्यांना भाजपमध्ये घेत आहेत. याला भागवत सहमत आहेत का, असा सवाल केजरीवाल यांनी केला.

आपच्या समर्थकांची नावे मतदार यादीतून हटवण्याचा भाजपाचा डाव

आपच्या समर्थकांची नावे मतदार यादीतून हटवण्याचा भाजपाचा डाव असल्याचा आरोप आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी केला. आपच्या मतदारांची ओळख पटवून त्यांची नावेच मतदार यादीतून हटवण्यासाठी भाजपाने पैसे देऊन कर्मचारी तैनात केल्याचा आरोपही त्यांनी केला. आगामी फेब्रुवारीत होणाऱ्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत दणदणीत पराभव होणार असल्याची जाणीव भाजपाला झाल्याचा टोलाही केजरीवाल यांनी लगावला.

भ्रष्ट नेत्यांचा पाढाच वाचला

भाजपमध्ये सामील झालेल्या किंवा भाजपला पाठिंबा देणाऱ्या देशभरातील भ्रष्ट नेत्यांचा केजरीवाल यांनी यावेळी पाढाच वाचला. हेमंत बिस्वा सरमा, प्रफुल्ल पटेल, हसन मुश्रीफ, प्रताप सरनाईक, यशवंत जाधव, संजय शेठ, कृपाशंकर सिंह, अशोक चव्हाण, नवीन जिंदाल, तपस रे, अर्चना पाटील, गीता कोडा, बाबा सिद्धीकी, ज्योती मिंडा, के. गीता, सुझाना चौधरी या नेत्यांची यादीच केजरीवाल यांनी जाहीर केली.