पहिल्या दिवशी पावसाचीच फटकेबाजी, दिवसभरात पावसामुळे 55 षटकांचा खेळ वाया

ग्रीन पार्कच्या खेळपट्टीवर फलंदाज हे फिरकीच्या तालावर नाचतात हा गेल्या चार दशकांचा इतिहास असला तरी रोहित शर्माने पावसाच्या शक्यतेमुळे चेन्नईचा विजयी संघच कायम ठेवला आणि तीन फिरकीवीरांऐवजी तीन वेगवान गोलंदाजांनाच प्राधान्य दिले. पण दुसऱ्या कसोटीचा खेळ ना वेगवान गोलंदाजांच्या दहशतीने गाजवला, ना फिरकीच्या तालावर नाचला ना फलंदाजांच्या फटकेबाजीने गाजला. तो फक्त पावसाच्या तालावर नाचला. तब्बल 55 षटकांचा खेळ पावसानेच खेळून काढल्यामुळे फलंदाजांच्या वाट्याला केवळ 35 षटकेच आली आणि प्रथम फलंदाजीला उतरलेल्या पाहुण्या बांगलादेशने 3 बाद 107 अशी मजल मारली.

रोहितने इतिहास बदलला

ग्रीन पार्कची खेळपट्टी फिरकीला पोषक असली तरी कोण खेळणार याचा फैसला वातावरण पाहून घेण्यात आला. रोहित शर्माने ग्रीन पार्कचा इतिहास न पाहता तीन फिरकीवीरांऐवजी दोनच फिरकीवीरांना घेण्याचे धाडस दाखवले. विशेष म्हणजे टॉस जिंकल्यावर प्रथम फलंदाजी घेतली जाते. 1964 पासून हेच पाहायला मिळाले, पण रोहितने इतिहास बदलला. त्याने क्षेत्ररक्षण घेतले.

चेन्नई कसोटीत आपली फलंदाजी ढेपाळल्यामुळे त्याने या कसोटीत फलंदाजी टाळली. इतके धाडस दाखवणाऱ्या रोहितने लोकल बॉय कुलदीप यादवला आपल्या घरच्या मैदानावर पहिली कसोटी खेळण्याची संधीसुद्धा दिली नाही. गेली दोन वर्षे अनेकदा संघाबाहेर बसवल्यानंतरही अफलातून कामगिरी करणारा कुलदीप या कसोटीलाही मुकला. तसेच सरफराज खानला या कसोटीतही राहुलला बसवून अंतिम 11 खेळाडूंमध्ये संधी लाभू शकली नाही. त्यामुळे सरफराज आता मुंबईच्या सेवेत दाखल होईल हे नक्की झाले.

ग्राऊंड स्टाफनेच घाम गाळला

आज मैदानात खेळाडूंना घाम गाळण्याची संधी फार कमीच लाभली. रोहितने टॉस जिंकून बांगलादेशला फलंदाजीचे आमंत्रण दिले. पण पावसाच्या व्यत्ययामुळे खेळ वेळेवर सुरूच होऊ शकला नाही. रात्री पावसामुळे ओल्या झालेल्या आऊटफिल्डला सुकवण्यासाठी ग्राऊंड स्टाफला अक्षरशः घाम गाळावा लागला. त्यांच्या मेहनतीमुळे तासभर उशिराने खेळ सुरू झाला. त्यानंतर पहिले सत्र व्यवस्थित पार पडले. मात्र पहिल्या सत्रानंतर पावसाच्या व्यत्ययाने दहा षटकांचाही खेळ होऊ दिला नाही आणि 35 षटकांनंतर संततधार पावसामुळे पहिल्या दिवसाचा खेळ तेथेच थांबविण्याचा निर्णय पंचांनी जाहीर केला.

हक आणि शांतोने सावरले

आकाश दीपने सलामीवीरांचा अडथळा दूर केल्यानंतर मोमीनुल हक आणि कर्णधार नजमुल हुसेन शांतोने पहिले सत्र खेळून काढून बांगलादेशी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. दोघांनीही धावांची तिशी गाठत अर्धशतकी भागीही रचली. उपाहाराला 2 बाद 74 अशी मजल त्यांनी मारली होती. पण उपाहारानंतर पावसाने खेळात व्यत्यय आणला आणि याचा लाभ अश्विनने उचलला. त्याने शांतोला पायचीत करत हिंदुस्थानला तिसरे यश मिळवून दिले.

दुसरीकडे मोमीनुलने काही सुरेख फटके खेचत संघाला शतकी टप्पा गाठून दिला. उपाहारानंतर अवघ्या 9 षटकांचाच खेळ झाला. त्यानंतर पुन्हा खेळ सुरूच होऊ शकला नाही. पंचांनीही पावसामुळे मोठ्या प्रमाणात ओली झालेली खेळपट्टी पाहून पावणेतीन वाजता खेळ थांबविण्याचा निर्णय घेतला. खेळ थांबला तेव्हा मोमीनुल 41, तर मुशफिकर 6 धावांवर खेळत होते.

मैदानात दीप उजळला

आकाशात ढगाळ वातावरण होते. जसप्रीत बुमरा आणि मोहम्मद सिराजने हिंदुस्थानच्या डावाची सुरुवात केली. दोघांनीही 7 षटके गोलंदाजी केली, पण खेळपट्टीचा लाभ दोघांनाही उचलता आला नाही. त्यामुळे रोहितने आठव्या षटकात अश्विनच्या हातात चेंडू दिला आणि नवव्या षटकात आकाश दीपलाही आणले.

गेल्या कसोटीतही चमकदार कामगिरी करणाऱ्या आकाश दीपने आपल्या सामन्यातील तिसऱ्याच चेंडूवर झाकीर हसनला यशस्वी जैसवालकडे झेल देण्यास भाग पाडले आणि हिंदुस्थानला अपेक्षित असलेले यश मिळवून दिले. झाकीरने 24 चेंडूंचा सामना केला, पण त्याला एकही धाव काढता आली नाही आणि तो भोपळा न फोडताच माघारी परतला. बांगलादेशच्या अवघ्या 26 धावा झाल्या होत्या.

पहिले यश आणि पहिले षटक निर्धाव टाकल्यानंतर आकाशने दुसरे षटकही निर्धाव टाकले आणि आपल्या तिसऱ्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर शादमन इस्लामला पायचीत केले. बांगलादेश 2 बाद 29 आणि आकाशने एकही धाव न देता बांगलादेशी सलामीवीरांना 11 चेंडूंच्या अंतरात बाद केले. बांगलादेशच्या पहिल्या 29 धावांमध्ये 24 धावा शादमनच्या होत्या आणि उर्वरित पाचही अवांतर धावा होत्या.