Ind Vs Ban 2nd Test – कानपूर कसोटीला पावसामुळे ब्रेक, बांगलादेशने बनवल्या 107 धावा

टीम इंडिया आणि बांगलादेश यांच्यामध्ये आज दुसऱ्या कसोटी सामन्याला कानपुरमध्ये सुरुवात झाली. मात्र पावसाने हजेरी लावल्यामुळे पहिल्या दिवसाचा खेळ फक्त 35 षटकांमध्ये संपूष्टात आला. पहिल्या दिवसाअखेर बांगलादेशने तीन विकेट गमावत 107 धावा केल्या आहेत.

टीम इंडिया आणि बांगलादेश यांच्यामध्ये सुरू असलेल्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतीत दुसऱ्या सामन्याला शुक्रवार (27 सप्टेंबर) पासून सुरुवात झाली. कानपुरच्या ग्रीनपार्क स्टेडियमवर सुरू असलेल्या या सामन्याच्या पहिल्याच दिवशी पावसाची बॅटींग पहायला मिळाली. नाणेफेक जिंकून रोहित शर्माने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेत, बांगलादेशला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. मात्र बांगलादेशची सुरुवात खराब झाली. त्यांना पहिला हादरा 26 या धावसंख्येवर झाकिर हसनच्या स्वरुपात बसला. त्यानंतर आकाश दीपने शादमान इस्लामला LBW करत 29 या धावसंख्येवर बांगलादेशची दुसरी विकेट घेतली. त्याचबरोबर अश्विनने बांगलादेशच्या कर्णधाराला आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवले आणि बांगलादेशला तीसरा धक्का नझमुल हुसैन शांतोच्या स्वरुपात बसला.

पाऊस आणि खराब प्रकाशामुळे पहिल्या दिवसाचा खेळ फक्त 35 षटकांचा होऊ शकला. दिवसा अखेर बांगलादेशने 3 विकेट गमावत 107 धावा केल्या आहेत. दरम्यान, रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडियाने चेन्नई येथे झालेला पहिला कसोटी सामना जिंकला आहे.