संयुक्त राष्ट्रे सुरक्षा परिषद कायम सदस्यत्वासाठी फ्रान्सचा हिंदुस्थानला पाठिंबा

संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचे कायमस्वरूपी सदस्यत्व मिळवण्याच्या हिंदुस्थानच्या प्रयत्नांना फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी पाठिंबा दिला आहे. हिंदुस्थान, जर्मनी, जपान आणि ब्राझील यांना स्थायी सदस्यत्व द्यायला हवे. बदलत्या जागतिक परिस्थितीचे योग्य प्रतिनिधित्व करण्यासाठी सुरक्षा परिषदेचा सर्वसमावेशक विस्तार व्हायला हवा, असे त्यांनी गुरुवारी संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत सांगितले.

फ्रान्स सुरक्षा परिषदेचा विस्तार करण्याच्या बाजूने आहे. आफ्रिकेकडून सुचवण्यात येणाऱ्या दोन देशांनाही कायम सदस्य बनवावे, असे मॅक्रॉन म्हणाले. मात्र एवढ्यामुळेच परिषदेचा प्रभाव पुनर्स्थापित होणार नाही. जागतिक शांतता राखण्यासाठी आवश्यक निर्णयांकडे अधिक लक्ष देणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

हिंदुस्थानला वाढता पाठिंबा

कायमस्वरूपी सदस्यत्वासाठी हिंदुस्थानने चालवलेल्या प्रयत्नांना अलीकडच्या काळात वेग आला आहे. विशेषतः नुकत्याच झालेल्या क्वाड राष्ट्रांच्या परिषदेतही हिंदुस्थानला अप्रत्यक्ष पाठबळ देणारे सकारात्मक निवेदन अमेरिका, हिंदुस्थान, जपान आणि ऑस्ट्रेलिया या क्वाडच्या सदस्य राष्ट्रांनी जारी केले होते. सुरक्षा परिषद रचनेत सुधारणा आणि परिषद अधिक सर्वसमावेशक बनवण्याच्या प्रयत्नांना पाठिंबा असल्याचा पुनरुच्चार या संयुक्त निवेदनात केला होता. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकेन यांनीही हिंदुस्थानच्या दाव्याला अमेरिकेचा पाठिंबा असल्याचे आमसभेत सांगितले होते.