चिखलामुळे ‘कमळा’ची माघार, मोदींच्या सभेसाठीचा कोट्यवधी रुपयांचा खर्च पाण्यात!

pune-metro4
पुणे मेट्रोचं काम जोरात सुरू असून मेट्रोचे डबे पुण्यात दाखल झाले आहेत (सर्व फोटो - चंद्रकांत पालकर)

विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे दौऱ्यावर येणार होते. त्यासाठी महापालिका आणि मेट्रो प्रशासनाने जय्यत तयारी केली. रस्त्यांची डागडुजी, मेट्रो स्टेशनची सजावट, एस. पी. कॉलेजच्या मैदानावर होणाऱ्या सभेसाठी भव्य मंडप टाकला, मात्र मुसळधार पावसाने सभास्थळ चिखलात गेले.

चिखल काढण्यासाठी 48 तास सरकारी यंत्रणा काम करत होती, परंतु पावसामुळे मोदींनी पुणे दौराच रद्द केला. चिखलामुळे ‘कमळा’ने माघार घेतली असली तरी मोदींचा दौरा आणि सभेची तयारीसाठीचा कोट्यवधी रुपयांचा खर्च पाण्यात गेला आहे. दरम्यान, उद्घाटनाअभावी मेट्रो सेवा लांबणीवर पडली आहे.

पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते गुरुवारी (दि. 26) मेट्रो प्रकल्पाच्या सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट या भूमिगत मार्गाचे उद्घाटन आणि स्वारगेट ते कात्रज या मार्गाचे भूमिपूजन होणार होते. याबरोबरच इतरही प्रकल्पांचे भूमिपूजन आणि उद्घाटनही होणार होते. मोदींच्या दौऱ्यानिमित्त जय्यत तयारी सुरू होती, मात्र गेल्या आठवड्यात सलग तीन दिवस पाऊस झाला होता. रेड अलर्टमुळे बुधवारी शहरभर पावसाने थैमान घातले.

पावसामुळे एस. पी. कॉलेज मैदानावरील सभामंडपात पावसाचे पाणी आणि चिखल यामुळे सर्वत्र दलदल झाली. ज्या मार्गाने पंतप्रधान मोदी स्टेजवर जाणार होते, त्या मार्गावर आणि मैदानावर सगळीकडे पाणी आणि चिखलाचे साम्राज्य पसरले होते.

गुरुवारी (दि. 26) सकाळपर्यंत एस. पी. कॉलेज मैदानातील सभास्थळावर मैदानातील दलदलीवर मुरूम-खडी टाकून चिखल कमी करण्यासाठी महापालिका व मेट्रो प्रशासनाकडून प्रयत्न केले जात होते, पण ते यशस्वी न झाल्याने सभेचे स्थळ बदलले जाणार अशी चर्चा सुरू होती. त्यानुसार स्वारगेटजवळील गणेश कला क्रीडा मंच येथे व्यवस्था करण्यात आली, मात्र गुरुवारीही पुण्यात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली. ऑरेंज अलर्ट जारी केल्याने मोदींचा दौरा रद्द करण्यात आला.

मेट्रो प्रशासन म्हणते, खर्च सांगता येणार नाही

पुणे मेट्रोच्या जिल्हा न्यायालय मेट्रो स्थानक ते स्वारगेट मेट्रो स्थानक या भूमिगत मार्गाचे उद्घाटन पुढे ढकलण्यात आले आहे, मात्र लवकरच हा मार्ग प्रवाशांसाठी खुला केला जाईल, असे मेट्रो प्रशासनाकडून कळविण्यात आले. मात्र या सभेसाठी महापालिकेला सुमारे 10 ते 15 लाखांचा रस्त्यांच्या डागडुजीसाठी खर्च आला असे सांगण्यात येते. मात्र, एस. पी. कॉलेज मैदानावरील सभास्थळी झालेला कोट्यवधी रुपयांचा खर्च पुणे मेट्रोने केला आहे. परंतु या खर्चाबाबत मेट्रो प्रशासनाकडून माहिती देण्यास टाळाटाळ करण्यात आली.