ऑनलाइन रमी कौशल्याचा खेळ कसा? हायकोर्टाने उपस्थित केला प्रश्न; राज्य शासनासह खुलासा करण्याचे आदेश

ऑनलाइन रमी हा कौशल्याचा खेळ कसा असू शकतो, असा सवाल करत उच्च न्यायालयाने याचा खुलासा शपथपत्रावर करण्याचे आदेश राज्य शासनासह जंगली रमी व रमी सर्कलला दिले आहेत. ऑनलाइन रमीवर बंदी आणावी, अशी मागणी करणारी फौजदारी जनहित याचिका गणेश ननावरे यांनी दाखल केली आहे.

मुख्य न्यायाधीश देवेंद्र कुमार उपाध्याय व न्या. अमित बोरकर यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. ऑनलाइन रमी हा संधीचा खेळ नसून कौशल्याचा खेळ आहे याचा खुलासा होणे आवश्यक आहे, असे निरीक्षण नोंदवत खंडपीठाने हे आदेश दिले. यावरील पुढील सुनावणी 16 ऑक्टोबर 2024 रोजी होणार आहे.

काय आहे प्रकरण

ऑनलाइन रमी हा जुगार आहे. याने तरुणाईला वेड लावले आहे. मोठे सेलिब्रेटी ऑनलाइन रमीची जाहिरात करतात. त्यामुळे त्यांचे चाहते या खेळाकडे आकर्षित होतात. ऑनलाइन रमीमुळे अनेकांचे आर्थिक नुकसान झाले. नुकसानामुळे काही जणांनी आत्महत्या केली आहे. अशा या घातक जुगारावर बंदी आणावी, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे.