गद्दार आमदाराच्या पत्नीची गटशिक्षणाधिकाऱ्याला मारहाण, आरसीएफ शाळेच्या पालक बैठकीत धिंगाणा

मिंधे गटाचे अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांच्या पत्नी व माजी जिल्हा परिषद सदस्य मानसी दळवी यांची दबंगगिरी समोर आली आहे. कुरुळ येथील आरसीएफ शाळा बंद करण्याचा डाव हाणून पाडण्यासाठी शेकडो पालकांनी आज शाळेवर धडक देत व्यवस्थापन व जिल्हा परिषद शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांना जाब विचारला. यावेळी शांतपणे चर्चा सुरू असतानाच मानसी दळवी यांनी बैठकीत एण्ट्री करत धिंगाणा घातला. इतकेच नाही तर गट शिक्षण अधिकाऱ्यासह अन्य दोन अधिकाऱ्यांना मारहाण केली. त्यामुळे पालकांच्या आंदोलनाला गालबोट लागले.

आरसीएफ कंपनी अलिबागच्या कुरुळ येथे शाळा उभारली असून या शाळेचे व्यवस्थापन पुणे येथील डेक्कन एज्युकेशन संस्थेकडे आहे. मात्र यापुढे संस्थेने शाळा चालवण्यास इच्छुक नसल्याचे जाहीर केले आहे. परंतु शाळा सुरू राहावी यासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. अशातच माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी शाळेतील शिक्षकांचे समायोजन जवळच्या शाळांमध्ये करता येणे शक्य असल्याचा अहवाल विभागीय शिक्षण उपसंचालकांकडे 23 सप्टेंबर रोजी सादर केला आहे.

यामुळे शाळा आता बंद होईल या भीतीने संतप्त झालेल्या शेकडो पालकांनी आज शाळेवर धडक देत मुख्याध्यापक तसेच शाळा व्यवस्थापनाला जाब विचारला. परंतु याचवेळी या बैठकीत आलेल्या मानसी दळवी यांनी शिक्षण विभागातील सहाय्यक प्रशासन अधिकारी अशोक कुकलारे, अलिबाग गट शिक्षण अधिकारी कृष्णा पिंगळा व आणखी एका अधिकाऱ्याला मारहाण करत धिंगाणा घातला. त्यामुळे चांगलाच गोंधळ उडाला. दळवी यांच्या या झुंडशाहीमुळे मूळ विषय बाजूला पडेल, अशी भीती काही पालकांनी व्यक्त केली.

डेक्कन एज्युकेशन सोसायटी संस्थेने किमान 2 वर्षे शाळा चालवावी अशी विनंती कोर्टात कंपनीने केली आहे. मात्र या सोसायटीने शाळा चालवण्यास ठाम नकार दिल्यास दुसरी संस्थेची निवड केली जाईल, असे आरसीएफ कंपनीचे जनसंपर्क अधिकारी संतोष वझे यांनी सांगितले.