देशभरातील महत्वाच्या घडामोडी

हाजी अली दर्ग्यात बॉम्ब ठेवल्याची धमकी; कॉलरविरोधात गुन्हा

हाजी अली दर्ग्यात बॉम्ब ठेवलाय असा दर्ग्याच्या कार्यालयात दूरध्वनी करून धमकी देणाऱ्याविरोधात ताडदेव पोलिसांनी गुन्हा दाखल केला. दूरध्वनी करणाऱ्या कॉलरने स्वतःचे नाव पवन असल्याचे सांगितले होते. पोलीस अधिक तपास करत आहेत. मंगळवार व बुधवारी असे दोन दिवस दर्ग्यात बॉम्ब ठेवल्याचा धमकीचा दूरध्वनी आरोपीने केला होता. त्यासाठी कॉलरने दोन वेगवेगळ्या नंबरचा वापर केला होता. त्यामुळे याची गंभीर दखल घेत हाजी अली दर्ग्याच्या प्रशासकीय अधिकाऱ्याने दिलेल्या तक्रारीवरून ताडदेव पोलिसांनी बुधवारी गुन्हा दाखल केला आहे.

नेहरू सेंटरला संगीत संध्या

नेहरू सेंटरने महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त 2 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 7 वाजता ‘संतवाणी एक भक्तिमय संगीत संध्या’ या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. गांधीजी यांची निवडक भजने ही उपस्थित प्रेक्षकांना ऐकायला मिळणार आहेत. यानिमित्ताने भक्तिगीतही सादर केले जाणार आहेत. त्यासाठी ‘सूर नवा ध्यास नवा’ फेम प्रशांत काळुंद्रेकर यांना या कार्यक्रमासाठी निमंत्रित केले आहे. शिवाय मराठी आणि हिंदी चित्रपटासाठी गायिका म्हणून परिचयाच्या असलेल्या मोना कामत-प्रभुगावकर यांचासुद्धा या कार्यक्रमात गायिका म्हणून सहभाग असणार आहे. मेघना काळुंद्रेकर काही गीते सादर करणार आहेत. निवेदनाची जबाबदारी दिलीप जोशी यांच्यावर सोपवली आहे. प्रेक्षकांना विनामूल्य या कार्यक्रमाचा आनंद घेता येणार असून प्रवेशिका 27 सप्टेंबरला सकाळी 10.30 वाजल्यापासून मिळतील.

दहिसरमध्ये सप्ताह

दहिसर येथील ब्लू गॅलेक्सी श्री राधा कृष्ण महिला भजन मंडळ व शिवसेना उपनेते विनोद घोसाळकर यांच्या विशेष सहकार्याने श्रीमद् भागवत सप्ताह ज्ञानयज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे. 23 ते 29 सप्टेंबर या कालावधीत दररोज दुपारी 3 ते संध्याकाळी 7 पर्यंत दहिसर पूर्व येथील समाज कल्याण हॉल येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कालावधीत व्यासपीठावर विराजू कथाकार प. पू. भरत जोशी आपल्या संगीतमय मधुर वाणीतून कथा सादर करतील.

जर्मनीत नोकरीची संधी

महाराष्ट्रातील कुशल कामगारांना जर्मनीने आवतण दिले आहे. तेथील बाडेन-वुर्टेम्बर्ग राज्यात त्यांना हमखास नोकरी मिळणार आहे. त्यासाठी त्या राज्याने ‘लँड हिअर’ ही मोहीम महाराष्ट्रात सुरू केली आहे. जर्मनीत कुशल कामगारांची गरज आहे. ही मोहीम त्याची पूर्तता करेल. दोन्ही राज्यांनी कुशल कामगार भर्ती व व्यावसायिक प्रशिक्षण यासंदर्भात एका संयुक्त जाहीरनाम्यावर सह्या केल्या. कामगार भर्ती प्रयत्नांना चालना देण्यासाठी पुण्यात एका सेवा कक्षाची स्थापना करण्यात आली असून महाराष्ट्र सरकारही स्टुटगार्टमध्ये एक प्रतिनिधी कार्यालय उघडत आहे.

धनगर आरक्षणासाठी दोन आंदोलकांनी जलसमाधी घेतल्याची भीती

धनगर समाजाला अनुसूचित प्रवर्गातून आरक्षण मिळावे, या मागणीसाठी उपोषण, आंदोलन सुरू होऊन नऊ दिवस झाले तरी शासन दुर्लक्ष करत असल्याने उपोषणकर्त्यांपैकी दोघांनी जलसमाधी घेतल्याची भीती व्यक्त होत आहे. ‘आम्ही आरक्षणासाठी जलसमाधी घेत असून, तुम्हाला शेवटचा जय मल्हार’ अशी चिठ्ठी लिहून ती चारचाकी गाडीत ठेवल्याचे आढळले आहे. नगर-छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील प्रवरासंगम पुलावर ही मोटार उभी असल्याचे दिसून आले. उपोषणादरम्यान प्रल्हाद सोरमारे आणि रामराव कोल्हे यांची प्रकृती खालावली होती. त्यांनी उपचार घेण्यास नकार दिला होता. उपोषण सुरू असताना बाळासाहेब कोळसे, प्रल्हाद सोरमारे हे आज सकाळी प्रातर्विधीला जातो, असे सांगून निघून गेले होते.

रविकांत तुपकरांना अटक

शेतकरी नेते रविकांत तुपकर यांना आंदोलनादरम्यान अटक करण्यात आली. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तुपकर पुन्हा आक्रमक झाले होते. पिक विम्याचे पैसे न मिळाल्याने रविकांत तुपकर यांचे बुलढाणा जिल्हा कृषी अधीक्षक कक्षात मुक्काम आंदोलन सुरु होते, त्याचवेळी त्यांना अटक करण्यात आली.

परराष्ट्र व्यवहार आणि शिक्षण समितीचे अध्यक्षपद काँग्रेसला

संसदेच्या स्थायी समित्यांचे अध्यक्ष अखेर घोषित झाले आहेत. काँग्रेसला परराष्ट्र व्यवहार आणि शिक्षण समितीचे अध्यक्षपद देण्यात आले आहे. अनुक्रमे शशी थरूर आणि दिग्विजय सिंह समितीचे अध्यक्ष असतील. अर्थ, संरक्षण, गृह या महत्त्वाच्या समित्या भाजपने स्वतःकडे ठेवल्या आहेत. भाजपचे बी महताब अर्थ समितीचे तर, भाजपचेच राधामोहन दास अग्रवाल गृह समितीचे अध्यक्ष असतील. संरक्षण समितीच्या अध्यक्षपदी भाजपचे राधामोहन सिंह असतील.

बिल्किस बानोप्रकरणी गुजरातची याचिका फेटाळली

बिल्किस बानो बलात्कार आणि हत्येप्रकरणी दोषी ठरलेल्या 11 जणांना देण्यात आलेली माफी रद्द करताना गुजरात सरकारवर मारलेले ताशेरे रद्द करण्याची मागणी करणारी राज्याची याचिका सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी फेटाळून लावली. ही याचिका, आदेश, कागदपत्रे पाहिल्यावर फेरविचार करण्यासारखी कोणतीही योग्य बाब दिसत नाही. यामुळे याचिका फेटाळत असल्याचे खंडपीठाने सांगितले.

उल्हासनगरात पोलीस ठाण्यातच महिला पोलिसावर ब्लेडने हल्ला

खोके सरकारच्या काळात कायदा सुव्यवस्थेचे वारंवार धिंडवडे निघत असून आता पोलीसदेखील सुरक्षित नसल्याचे उघड झाले आहे. विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात आलेल्या बाबासाहेब सोनवणे या मद्यधुंद तक्रारदाराने चक्क महिला पोलीस कर्मचाऱ्यावरच ब्लेडने सपासप वार केल्याची घटना आज घडली. या हल्ल्यात शीतल भांबळे या गंभीर जखमी झाल्या आहेत.

46 जणांचा बुडून मृत्यू

आपल्या मुलांच्या कल्याणासाठी बिहारमध्ये तीन दिवस साजऱ्या केल्या जाणाऱ्या जीवितपुत्रिका उत्सवादरम्यान नदी, तलावांमध्ये स्नान करताना बुडून 46 जणांचा मृत्यू झाला. यात 37 मुले आहेत. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मृतांच्या नातेवाईकांना 4 लाख रुपयांची मदत जाहीर केली.

एमपीएससीच्या परीक्षेत महेश घाटुळे पहिला, मुलींमध्ये वैष्णवी बावस्कर अव्वल

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या राज्य सेवा मुख्य परीक्षा 2023 परीक्षेची सर्वसाधारण गुणवत्ता यादी आज आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली. यात महेश घाटुळे याने प्रथम क्रमांक पटकावला आहे. प्रीतम सानप याने दुसरा तर शुभम पवार याने तिसरा क्रमांक पटकावला. मुलींमध्ये वैष्णवी बावस्कर हिने अव्वल येण्याचा मान मिळवला. आता उमेदवारांना आपल्या पदांचे पसंतीक्रम द्यावे लागणार आहेत. या परीक्षेची सर्वसाधारण गुणवत्ता यादी तात्पुरत्या स्वरुपाची आहे.