गजमुखा वंदन तुज पहिले, सात नवदुर्गांनी साकारले 42 बाप्पा

पहिले वंदन गणेशाला अशी आराधना करत चित्रकार प्रज्ञा राजे आणि त्यांच्या सहा विद्यार्थिनींनी आपल्या जादुई कुंचल्यातून साकारलेल्या गणपतीची विविध रूपे पाहण्यासाठी मुंबईकरांची वरळीच्या नेहरू सेंटर आर्ट गॅलरीत झुंबड उडाली. या प्रदर्शनाचे उद्घाटन सल्लागार आणि अभ्यासक्रम विकासक गीता कॅसेलिनो यांच्या हस्ते करण्यात आले. पहिल्याच दिवशी या प्रदर्शनाला मुंबईकरांनी भरभरून प्रतिसाद दिला. प्रथम या संस्थेच्या क्युरेटर आर्टिस्ट प्रज्ञा राजे यांच्या पुढाकाराने आयोजित केलेल्या प्रदर्शनात बाप्पाची 42 मनोवेधक रूपे पाहताना रसिकांच्या डोळ्यांचे पारणे फिटत आहे.

वरळीच्या नेहरू सेंटर आर्ट गॅलरीत मंगळवारपासून सुरू झालेले हे प्रदर्शन सोमवार 30 सप्टेंबरपर्यंत चालणार आहे. प्रज्ञा राजे यांच्यासह अंजली देशपांडे, अंजली हरनाहली, अन्नपूर्णा धबाडे, प्रज्ञा राजे, समिरा नवलकर, स्वाती भटावडेकर, तृप्ती तलपडे या सात नवदुर्गांनी अ‍ॅक्रेलिक कलरच्या रंगसंगतीतून साकारलेली 42 बाप्पांची विविध रूपे रेखाटली आहेत.

कोणतेही प्रशिक्षण न घेता केवळ आवडीच्या जोरावर त्यांनी अवघ्या सहा महिन्यांत ही चित्रे साकारली. रंगांचा मुबलक प्रमाणात केलेला वापर आणि लक्षवेधी चित्रे हे या कलाकृतींचे वैशिष्ट्ये आहेत. पेंटिंगच्या आधुनिक प्रकारातील आगळ्यावेगळ्या शैलीची ही चित्रे रसिकांचे लक्ष वेधत आहेत. शेकडो नागरिकांनी या प्रदर्शनाला भेट देत या कलाकृती कशा रेखाटल्या याबद्दल माहिती जाणून घेतली.

आवडीतून निर्माण झालेली चित्रकला

चित्रकार प्रज्ञा राजे यांनी चित्र रेखाटण्यासाठी कोणतेही प्रशिक्षण घेतलेले नाही. त्यांना बालपणापासून चित्र काढण्याची आवड होती. या आवडीतूनच त्यांची चित्रकर्ती म्हणून ओळख निर्माण झाली. त्यांनी आतापर्यंत अनेक बोलकी चित्रे साकारली आहेत. विविध रंगछटांमधून चित्रांना जिवंतपणा आणण्यात त्यांचा हातखंडा आहे. यापूर्वी 2023 मध्ये त्यांच्या चित्रांचे प्रदर्शन भरवले होते.