प्रदूषणकारी आरएमसी प्लांट परवानगी रद्द करा, अन्यथा जोरदार आंदोलन; शिवसेनेचा प्रदूषण नियंत्रण मंडळाला इशारा

प्रकाश नगर, एल. यू. गडकरी मार्ग येथे प्रदूषणकारी आणि नागरिकांच्या जिवाला धोकादायक ठरणारे आरएमसी प्लांट उभारण्याचे कारस्थान सुरू आहे. त्यामुळे या आरएमसी प्लांटला परवानगी देऊ नये, अन्यथा शिवसेना स्टाईल जोरदार आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिवसेनेने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला दिला आहे. याबाबत शिवसेनेच्या माजी नगरसेविका निधी शिंदे यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या प्रादेशिक अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून मेसर्स गेनॉन नॉर्टन इंजिनीअरिंग प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला आरएमसी प्लांटसाठी दिलेली परवानगी रद्द करावी या मागणीसाठी याआधी दोन वेळा पत्र देण्यात आले आहे. याच ठिकाणी वस्तीला लागून असणाऱ्या दुसऱ्या जागेवरसुद्धा स्कायवे आरएमसी प्लांट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीलासुद्धा आरएमसी प्लांटसाठी परवानगी दिल्याची माहिती समोर येत आहे. यापूर्वी याच ठिकाणी 2017 पर्यंत आरएमसी प्लांटमुळे लोकांना झालेल्या यातना लोक विसरू शकली नाहीत. प्रचंड प्रयत्नानंतर हा प्लांट बंद करण्यासाठी आम्हाला यश मिळाले. प्लांटमुळे यापूर्वीच लोक त्रस्त होते व लोकांनी हा प्लांट बंद करण्यासाठी आपल्याकडेसुद्धा मागणी केली होती.

प्रकरण लोकायुक्त व कोर्टातसुद्धा गेले याची संपूर्ण माहिती ऑन रेकॉर्ड असतानासुद्धा आपल्या कार्यालयामार्फत एक नव्हे दोन आरएमसी प्लांटला परवानगी देणे म्हणजे स्थानिक लोकांवर अन्याय करण्यासारखे आहे. त्यामुळे ही परवानगी रद्द करावी अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिवसेनेने दिला आहे. हे आंदोलन शिवसेना नेते-खासदार अनिल देसाई व विभागप्रमुख प्रमोद शिंदे आणि महिला विभाग संघटक पद्मावती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली 7 ऑक्टोबर 2024 रोजी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ कार्यालय, शीव पूर्व येथे करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.