‘बेस्ट’च्या नव्याकोऱ्या एसी मिनी बस भंगारात, ‘बेस्ट’ कामगार सेनेकडून पोलखोल

सर्वसामान्य मुंबईकरांसाठी वाहतुकीचे प्रमुख साधन असलेला ‘बेस्ट’ उपक्रम पुरेशा गाड्या उपलब्ध नसल्याचे कारण प्रशासनाकडून सांगितले जात असताना चेंबूरजवळील आणिक आगारात मात्र अनेक नव्याकोऱ्या मिनी एसी बस भंगारात सडत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्रशासनाने कंत्राटदारांची देणी थकवल्याने या गाड्या भंगारात सडत ठेवल्याचे ‘बेस्ट’ कामगार सेनेचे अध्यक्ष सुहास सामंत यांनी म्हटले आहे. या बसबाबत तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

रेल्वेनंतर मुंबईची दुसरी लाइफ लाइन असलेल्या ‘बेस्ट’ प्रवाशांची दररोजच्या प्रवाशांची संख्या 32 ते 35 लाखांवर गेली आहे. ‘बेस्ट’च्या ताफ्यात सध्या एकूण 3196 बसेस आहेत. यातील अनेक बस त्यांची कालमर्यादा संपल्याने स्क्रॅबमध्ये जात असतात. या वर्षी बेस्टच्या ताफ्यातील 900 पैकी किमान 500 बस बाद होणार आहेत. त्यामुळे बेस्टकडे स्वतःच्या केवळ 300 बस उरल्याने गाड्यांचा तुटवडा निर्माण होऊ शकतो. यातच चार वर्षांपूर्वी उपक्रमात दाखल झालेल्या छोट्या रस्त्यांवर धावणाऱ्या फायदेशीर मिनी बस बंद पडणे, कंत्राटदाराची देणी थकवल्याने सडत असल्याचे समोर आले आहे.

विशेष म्हणजे तत्कालीन आयुक्त प्रवीण परदेशी आणि आता भाजपमध्ये गेलेले मान्यताप्राप्त संघटनेचे शशांक राव यांनी करारावर सह्या केल्यानेच खासगीकरणाला प्रोत्साहन मिळाल्याने ही स्थिती उद्भवल्याचा आरोपही सामंत यांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या वतीने आज बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष सुहास सामंत यांच्या नेतृत्वाखाली आणिक आगारातील सडणाऱ्या बसेस प्रकरणाचा भंडाफोड करण्यात आला. यावेळी शीव विधानसभा प्रमुख गोपाळ शेलार, महिला विभाग संघटक पद्मावती शिंदे, उपविभागप्रमुख प्रभाकर भोगले, रणजित चौगुले, माजी नगरसेवक रामदास कांबळे, शाखाप्रमुख संजय म्हात्रे आदी उपस्थित होते.

…अन्यथा जोरदार आंदोलन

बेस्टमध्ये सध्या गाड्यांची कमतरता असल्याचे सांगितले जाते. यामुळे सकाळच्या वेळी अनेक ठिकाणी सर्वसामान्य प्रवाशांच्या एक किमीच्या रांगा लागतात. प्रवाशांना तासन्तास ताटकळत उभे राहावे लागत आहे. सात वर्षांपासून ही भरती बंद आहे. बेस्टमधील 44 हजार कर्मचाऱ्यांची संख्या 22 हजारांवर आल्याने कामाचा बट्ट्याबोळ झाला आहे. त्यामुळे प्रवासी आणि बेस्ट ग्राहकांच्या सुविधेसाठी भरती करावी, गाड्यांची संख्या वाढवावी अशी मागणीही सुहास सामंत यांनी केली आहे. या मागण्या प्रशासनाने पूर्ण केल्या नाहीत तर जोरदार जनआंदोलन करण्यात येईल, असा इशाराही शिवसेनेकडून देण्यात आला आहे.