…तर कानपूर कसोटीच माझी शेवटची कसोटी! शाकिब अल हसनला बांगलादेशात जाण्याची भीती

खरंतर मला मिरपूरमध्ये कसोटी कारकीर्दीला अलविदा करण्याची इच्छा आहे, मात्र मायदेशी परतल्यावर माझ्यावर अटकेची टांगती तलवार असेल. बांगलादेश क्रिकेट बोर्डाने माझ्या सुरक्षेची हमी घेतली तरच मी मिरपूरमध्ये अखेरचा कसोटी सामना खेळू शकेन. अन्यथा कानपूरमधील कसोटी सामनाच माझा अखेरचा समजा, अशी सूचक प्रतिक्रिया बांगलादेशचा स्टार अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसनने गुरुवारी दिली.

कानपूर कसोटी सामन्याच्या पूर्वसंध्येला शाकिब अल हसनने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. ‘मिरपूरमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात आपण कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होणार असल्याची माहिती त्याने दिली. मात्र त्याला मायदेशी परतण्यास आता भीती वाटत आहे, हे त्याच्या बोलण्यावरून स्पष्ट झाले आहे. कारण तो शेख हसीना यांच्या पक्षाकडून खासदार राहिलेला आहे. आता शेख हसीना यांचे सरकार उलथवून दुसरे सरकार आले आहे. या नव्या सरकारने शाकिबवर हत्या केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्यामुळे बांगलादेशात गेल्यानंतर आपल्याला अटक होऊ शकते, अशी भीती आता त्याला सतावत आहे.

देशातील सुरक्षेशी हमी न मिळाल्यास शाकिब अल हसन मायदेशी न जाता अमेरिकेला जाऊ शकतो. कारण त्याची पत्नी ही अमेरिकेची नागरिक आहे. त्यामुळे शाकिब अल हसन यापुढील पावले अतिशय सावधपणे टाकत आहे. शाकिब अल हसनने आपल्या वक्तव्यात म्हटले आहे की, मी मिरपूरमध्ये माझी शेवटची कसोटी खेळण्याची इच्छा बीसीबीकडे व्यक्त केली आहे. ते माझ्याशी सहमत आहेत. मी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मिरपूर कसोटीनंतर या फॉर्मेटला अलविदा करणार आहे. तसे झाले नाही तर कानपूरमधील हिंदुस्थानविरुद्धचा सामना हा माझा कसोटी क्रिकेटमधील शेवटचा सामना असेल.’

शाकिब अल हसनला चेन्नई कसोटीत आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नाही. त्याला या पहिल्या कसोटीत एकही विकेट मिळाली नाही. पहिल्या डावात त्याने 32 आणि दुसऱ्या डावात 25 धावा केल्या. यानंतर शाकिबच्या फिटनेसवर अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. तसेच बांगलादेशचा माजी कर्णधार तमीम इक्बालने शाकिबच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.