ग्रीन पार्क फिरकीच्या तालावर उभय संघ तीन फिरकीवीरांसह उतरण्याच्या तयारीत

ग्रीन पार्कच्या खेळपट्टीवर फिरकीचाच ग्रीन सिग्नल मिळालाय. त्यामुळे हिंदुस्थान असो किंवा बांगलादेश दोन्ही संघ शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या दुसऱ्या कसोटीत तीन-तीन फिरकीवीरांसह उतरण्याची तयार करत आहेत. पहिली कसोटी साडेतीन दिवसांत जिंकणारा यजमान कानपूरमध्येही बांगलादेशी फलंदाजीला आपल्या फिरकीच्या तालावर नाचवत मायदेशात मालिका विजयाचा झेंडा फडकावत ठेवण्यासाठी हिंदुस्थान सज्ज झाला आहे.

2012 सालानंतर हिंदुस्थान आपल्या मायदेशात एकही कसोटी मालिका हरलेला नाही आणि कानपूर कसोटीनंतरही हा पराक्रम कायम राहणार आहे. मायदेशातील कामगिरी दिवसेंदिवस बहरतच जात असल्यामुळे हिंदुस्थानला हिंदुस्थानात नमवणे ऑस्ट्रेलिया-इंग्लंडसारख्या बलाढ्य कसोटी संघांनाही गेल्या दोन वर्षांत शक्य झालेले नाही.

तीन-तीन फिरकीवीरांसंगे

ग्रीन पार्क स्टेडियमचा इतिहास पाहिल्यावर एक गोष्ट प्रामुख्याने डोळ्यासमोर येते, ती म्हणजे या खेळपट्टीवर तीन फिरकीवीरांशिवाय पर्याय नाही. खेळपट्टीची पाहणी केल्यानंतर सर्वांनीच फिरकीच्या तालावरच कसोटी नाचणार असल्याचे संकेत दिलेत. त्यामुळे हिंदुस्थान आणि बांगलादेशने तीन फिरकीवीरासह खेळण्याचे संकेत दिले आहेत.

कानपूरमध्ये 2021 मध्ये खेळली गेलेली कसोटी अश्विन, जाडेजा आणि अक्षर पटेलने गाजवली होती. ही कसोटी हिंदुस्थान जवळजवळ जिंकलीच होती. पण रचिन रवींद्र आणि एजाझ पटेलने तब्बल 52 चेंडूंचा यशस्वीपणे सामना करत ही कसोटी अनिर्णितावस्थेत सोडवली होती. हिंदुस्थानला ही कसोटी जिंकण्यासाठी नऊ षटकांत न्यूझीलंडचा फक्त शेवटचा फलंदाज बाद करायचा होता, पण ते शक्य झाले नाही.

कानपूर बॉय खेळणार

ग्रीन पार्क फिरकीला पोषक अशी खेळपट्टी आहे आणि या खेळपट्टीवर हिंदुस्थान रवींद्र जाडेजा आणि रविचंद्रन अश्विनसह कुणाला खेळवणार, हा मोठा प्रश्न आहे. कानपूरचा पुत्र असलेला कुलदीप यादवला खेळताना पाहण्यासाठी अवघा कानपूर उत्सुक आहे. दुसरीकडे 2021 मध्ये खेळलेली कसोटी गाजवणारा अक्षर पटेलही हिंदुस्थानी संघाबरोबर आहे. या दोघांपैकी संघ व्यवस्थापन कानपूरपुत्रालाच संधी देण्याची अधिक शक्यता आहे. कुलदीपला जेव्हा जेव्हा संधी मिळाली आहे तेव्हा त्याने संधीचे सोने केले आहे. त्यामुळे कानपूरमध्येही तो संधी मिळाल्यावर बांगलादेशी फलंदाजांना आपल्या फिरकीवर गरबा खेळायला लावेल, असे आधीच बोलले जात आहे.

सरफराजचे काय होणार?

तीन फिरकीवीरांसह हिंदुस्थानी संघ खेळण्याची शक्यता असल्यामुळे आकाश दीपला विश्रांती देत कुलदीप किंवा अक्षरची फिरकी संघाबरोबर दिसेल. पण मधल्या फळीत असलेल्या सरफराज खानला संधी मिळणार की नाही ? याबाबत साऱ्यांनाच शंका आहे. ग्रीन पार्कवर राहुलला विश्रांती देत सरफराजला खेळवले जाणार असल्याचे कोणतेही संकेत कसोटीच्या पूर्वसंध्येलाही मिळू शकलेले नाहीत. त्यामुळे संघात एक बदल होतोय की दोन ते उद्या कसोटी सुरू होण्यापूर्वीच कळू शकेल. जर सरफराजला संधी मिळाली नाही तर त्याला दुलीप ट्रॉफीमध्ये मुंबईसाठी आपल्या बॅटची कमाल दाखवता येऊ शकेल.

ग्रीन पार्कवर चार दशके अपराजित

हिंदुस्थान ग्रीन पार्कवर 23 कसोटी खेळलाय आणि त्यापैकी केवळ तीन कसोटीतच हरलाय. सात कसोटींत विजय मिळवलेत तर 13 कसोटी सामने अनिर्णितावस्थेत संपले. त्यामुळे ग्रीन पार्कवर हिंदुस्थानचेच पारडे जड राहिले आहे. विशेष म्हणजे 1983 सालानंतर हिंदुस्थानी संघ या मैदानावर एकही सामना हरलेला नाही. त्यात पाच विजय आणि चार अनिर्णित सामन्यांचा समावेश आहे. 1983 साली विंडीजविरुद्धचा सामना हिंदुस्थान डावाने हरला होता. या सामना माल्कम मार्शलच्या अष्टपैलू कामगिरीने अजरामर झाला होता.

सचिनला विराट मागे टाकणार

सचिनच्या आंतरराष्ट्रीय 100 शतकांच्या महाविक्रमापासून दिवसेंदिवस मागे पडत असलेल्या विराट कोहलीकडून कानपूर कसोटीत 35 धावा करताच सर्वात वेगवान 27 हजार आंतरराष्ट्रीय धावांचा सचिनला विक्रम मोडला जाईल. सचिनने हा विक्रम 623 डावांत केला होता, तर विराटने 593 डावांत 26,965 धावा केल्या आहेत. तो उद्या हा विक्रम मोडून सर्वात वेगवान 27 हजार आंतरराष्ट्रीय धावांचा विक्रम स्वतःच्या नावावर नोंदवेल.

कानपूर कसोटीसाठी संभाव्य संघ

हिंदुस्थान ः रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैसवाल, शुबमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत (यष्टिरक्षक), के. एल. राहुल, रवींद्र जाडेजा, रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव किंवा अक्षर पटेल, जसप्रीत बुमरा, मोहम्मद सिराज.

बांगलादेश ः शादमन इस्लाम, झकीर हसन, नजमुल होसैन शांतो (कर्णधार), मोमीनुल हक, मुशफिकर रहीम, शाकिब अल हसन, लिटन दास (यष्टिरक्षक), मेहिदी हसन मिराज, तैजुल इस्लाम, हसन महमुद, तस्किन अहमद.