मला तुरुंगात पाठवण्यामागे माझी आणि आम आदमी पार्टीची बदनामी करण्याचा भाजपचा हेतू होता, असा आरोप करत अरविंद केजरीवाल यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. हे लोक 27 वर्षांपासून दिल्लीत सत्तेबाहेर आहेत. त्यामुळे येथील जनतेला त्रास देऊन त्यांना सत्तेवर यायचे आहे. दिल्ली विधानसभेचे अधिवेशन गुरुवारपासून सुरू झाले. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी केजरीवाल यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले.
मी सर्वोच्च न्यायालयाचा आभारी आहे. मी देवाचे आणि देशातील करोडो जनतेचे आभार मानतो. मी नेहमी म्हणतो की मोदीजी खूप शक्तिशाली आहेत. त्यांच्याकडे अमाप पैसा आहे पण मोदीजी देव नाहीत, असे अरविंद केजरीवाल पुढे म्हणाले. आज मी मुख्यमंत्री आतिशी यांच्यासोबत दिल्ली विद्यापीठाच्या रस्त्याची पाहणी करण्यासाठी गेलो होतो. यावेळी मला सांगण्यात आले की पूर्वीचे रस्ते खूप चांगले होते पण आता ते खराब झाले आहेत.
आपल्या भाषणात पुढे केजरीवाल यांनी सभागृहात मोठा दावा केला. तीन-चार दिवसांपूर्वी आपण भाजपच्या एका मोठ्या नेत्याला भेटलो आणि त्यांना विचारले की मला अटक करून काय मिळाले? ते म्हणाले की, तुमच्या मागे दिल्ली ठप्प झाली. मला प्रश्न पडला की दिल्लीच्या दोन कोटी जनतेची कामं ठप्प करुन कोणी कसे आनंदी राहू शकते?
भाजप 27 वर्षांपासून दिल्लीत सत्तेपासून दूर आहे. लोक त्यांना मतं देत नाहीत. यामुळेच ते जनतेचा छळ होत आहे. दिल्ली सरकारची बदनामी करून तुम्हाला मते मिळवायची आहेत का? जनतेला सर्व काही समजते आणि ते मूर्ख नाही. जनता गप्प राहते आणि मतदानाच्या दिवशी बोलते, असे केजरीवाल यांनी आपल्या भाषणात म्हटले.