औरंगजेबाला मराठी माणसाचं राज्य मोडता आलं नाही; शहांनाही मोडू देणार नाही! – जयंत पाटील

अफगाणिस्तानहून कांदा आयात करत शेतकऱ्यांचे पानीपत करण्याचा डाव सरकारने आखला आहे असा घणाघाती आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे. नाशिक जिल्ह्य़ातील सिन्नरमध्ये शिवस्वराज्य यात्रेनिमित्त आयोजित सभेमध्ये ते बोलत होते.

अहमदशहा अबदाली अफगाणिस्तानहून आला आणि पानीपतची लढाई झाली. आता त्याच अफगाणिस्तानतून अमित शहा आणि त्यांच्या सरकारने कांदा आणला आहे. त्यामुळे कांद्याचे दर कोसळत आहेत. मराठा सैन्याचे पानीपत झाले तिथून शहा आणि त्यांच्या सरकारने कांदा आणला आणि मराठी शेतकऱ्यांचे पानीपत करण्याचा डाव आखला आहे, असा आरोप जयंत पाटील यांनी केला. देशातील शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव मिळू नये अशी भूमिका आजच्या राज्यकर्त्यांनी वेळोवेळी घेतली आहे असेही ते यावेळी म्हणाले.

शेतीमालाचा दर वाढायला लागला की सरकारच्या पोटात गोळा येतो. शेतीमालाचा कसा दर पडेल यासाठी जगातून कांदा, सोयाबीनचे तेल हुडकून काढतात आणि शेतकऱ्याचे कंबरडे मोडतात. लोकसभेप्रमाणे विधानसभेलाही सरकारला कांदा रडवणार, सोयाबीन रडवणार, कपाशी रडवणार, तसेच सर्व पिक विमांचे प्रश्न रडवणार, असेही जयंत पाटील म्हणाले.

NCP पक्ष आणि चिन्हाचा वाद: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वीच सुनावणी व्हावी; सुप्रीम कोर्टाला विनंती

शहांना मराठी राज्य मोडू देणार नाही!

हे लोक म्हणतात महाराष्ट्रात शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना रोखा. तिथे हरियाणा आणि जम्मू कश्मीरची निवडणूक चालू आहे. मात्र अमित शहा महाराष्ट्रात ठाण मांडून बसले आहेत. पण त्यांना हे माहीत नाही की, औरंगजेबाने देखील येथे 26 वर्ष काढली, मात्र मराठी राज्य त्याला मोडता आले नाही. शहांनाही आम्ही ते मोडू देणार नाही, असा इशाराही जयंत पाटील यांनी दिला.

खिशात नाही दमडा पण मला बाजीराव म्हणा

सर्व लाडक्या लोकांना खुश करण्यासाठी कर्ज करण्याची वेळ आता राज्य सरकारवर आली आहे. “खिशात नाही दमडा पण मला बाजीराव म्हणा” ही सरकारची गत आहे. सरकारची सर्व गणिते नाशिक जिल्ह्यातील लोक जाणून आहेत. त्यामुळे विधानसभेतील येथील सर्व जागा या महाविकास आघाडीच्या पदरात टाकण्यासाठी लोकं उत्सुक आहेत, असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.