
‘आंदोलने होतच असतात. त्याचा कवडीचाही परिणाम होत नाही!’ अशा शब्दांत नामोल्लेख न करता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मराठा आंदोलनाला हिणवले. आंदोलनाची चर्चाच करू नका, आंदोलनाचा विषय फडणवीस, बावनकुळे यांच्यावर सोपवा. पक्षातील वरिष्ठ अशा आंदोलनांकडे बघतील, असेही शहा म्हणाले.
छत्रपती संभाजीनगर येथे भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत अमित शहा यांनी मराठा आंदोलकांना डिवचले. लोकसभेत भाजपला मराठवाड्यात अपेक्षित यश मिळाले नाही. मात्र विधानसभा निवडणुकीत काहीही करून 46 पैकी 30 जागा आपल्याला निवडून आणायच्या आहेत. त्यासाठी लोकांपर्यंत पोहोचा. प्रत्येक बूथवर 10 टक्के मते वाढवा, मराठवाडा आपलाच आहे.
उद्धव ठाकरे, शरद पवार यांचे पक्ष फोडा!
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात झालेल्या पराभवाची धास्ती भाजप नेतृत्वाने घेतली आहे. त्यामुळेच अमित शहा यांनी नाशिक आणि कोल्हापूर येथे पदाधिकाऱ्यांसमोर बोलताना उघडपणे फोडाफोडीची भाषा केली. विधासभेत यश मिळवण्यासाठी महाविकास आघाडीत फोडाफोडी करा. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या बूथ लेवलच्या कार्यकर्त्यांना फोडा आणि या दोन्ही पक्षांचे मूळ संपवा, अशी ऑर्डर शहा यांनी दिली.