हिंदुजा-टाटाच्या आंतर रुग्णालयीन क्रिकेट स्पर्धेची नोंदणी सुरू

मुंबईच्या रुग्णालयांतील क्रिकेटपटूंसाठी वर्ल्ड कप असलेली गिरनार आंतर रुग्णालयीन क्रिकेट स्पर्धा येत्या जानेवारी महिन्यात खेळविली जाणार आहे. त्यामुळे या स्पर्धेच्या संघनोंदणीची प्रक्रिया सुरू झाली असून येत्या 5 ऑक्टोबरपर्यंत ती सुरू राहणार असली तरी प्रथम येणाऱ्या संघांनाच संधी दिली जाणार असल्याची माहिती स्पर्धा आयोजक मिलिंद सावंत यांनी दिली.

गेली 30 वर्षे अविरतपणे या स्पर्धेचे जोरदार आयोजन हिंदुजा रुग्णालय आणि टाटा रुग्णालय संयुक्तपणे करत आहे. या दोन्ही रुग्णालयांत सेवेत असलेले क्रिकेटपटू या स्पर्धेचे आत्मीयतेने आयोजन करत असल्यामुळे मुंबई क्रिकेट क्षेत्रात या स्पर्धेला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. मिलिंद सावंत आणि डॉ. हुमायूं जाफरी यांनी पुढाकार घेत 1994 साली खासगी आणि सरकारी रुग्णालयांत क्रिकेटपटूंना कायमस्वरूपी नोकरी लाभावी म्हणून या स्पर्धेचा श्रीगणेशा केला होता. जी स्पर्धा आजही जोशात सुरू आहे.

ही स्पर्धा एकंदर दोन गटांत खेळविली जात असून एलिट गटात अव्वल दर्जाच्या आठ रुग्णालयांचे संघ खेळतात तर प्लेट गटातही आठ संघ आपला जोरदार खेळ दाखवतात. या स्पर्धेच्या माध्यमातून मुंबई क्रिकेटला नंदू पाटील, अविनाश जाधव, जितेंद्र परदेशी, ओमकार जाधव, प्रदीप क्षीरसागरसारखे चमकदार क्रिकेटपटू लाभले आहेत.

मुंबई क्रिकेट संघटनेची मान्यता लाभलेल्या या स्पर्धेत प्रथम येणाऱ्या 16 संघांनाच खेळण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे स्पर्धा सहभागासाठी रुग्णालयातील संघांमध्ये चुरस पाहायला मिळणार आहे. स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी अनिल बैकर (9987034381) आणि डॉ. हुमायूं जाफरी (9869441414)यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.