बदलापुरातील चिमुरड्यांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या अक्षय शिंदे याचा एन्काउंटर करण्यात आला. यानंतर राज्यातील वातावरण ढवळून निघालं आहे. विरोधकांनी अक्षय शिंदेला फास्ट ट्रॅक कोर्टाद्वारे कारवाई करून फाशी द्यायला हवी होती अशी मागणी करत एन्काउंटरवर प्रश्न उपस्थित केले. त्याचवेळी सोशल मीडियावरून नेटकरी देखील आपली मते मांडत प्रश्न विचारत आहेत. नालासोपाऱ्यात भाजपचा जिल्हा उपाध्यक्ष बलात्कार प्रकरणात आरोपी आहे. त्याचाही एन्काउंटर करणार का? असा सवाल नेटकऱ्यांनी उपस्थित केला आहे.दरम्यान नालासोपाऱ्यात भाजपचा जिल्हा उपाध्यक्ष संजू श्रीवास्तव याच्यासह तीन जणांनी एका पीडितेवर सामूहिक बलात्कार केला आहे. याप्रकरणी आचोळे पोलीस ठाण्यात सामूहिक बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल झाला असून अत्याचारी भाजप संजू श्रीवास्तव पदाधिकाऱ्यांविरोधात संताप व्यक्त होत आहे.
2021 साली होळी सणाच्या दिवशी पीडित महिलेला संजू श्रीवास्तव याने कामाचे पैसे देण्याच्या बहाण्याने आचोळे येथील आपल्या कार्यालयात बोलावून घेतले होते. त्याठिकाणी शितपेयात गुंगीचे औषध टाकून संजू श्रीवास्तव आणि त्याचा साथीदार नवीन सिंगने महिलेवर सामूहिक बलात्कार केला होता. धक्कादायक बाब म्हणजे महिलेवर अत्याचार होत असताना आरोपी नवीन सिंग याची पत्नी हेमा सिंगने या घटनेचे चित्रीकरण केल्याची तक्रार पीडित महिलेने केली आहे. या व्हिडीओच्या आधारे वेळोवेळी ब्लॅकमेल करत तिच्यावर त्यानंतरही नवीन सिंग सातत्याने लैंगिक अत्याचार करत होता. या प्रकरणाची दखल घेत पोलिसांनी संजू श्रीवास्तव, नवीन सिंगविरोधात सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.
ह्या भाजप पदाधिकाऱ्याच पण एन्काऊंटर होणार का ?
शिंदे फडणवीस यावर उत्तर देतील का ? pic.twitter.com/zHvkQnLFEB
— गद्दारनाथ शिंदे (@YZ_Andhbhakt) September 25, 2024
नवीन सिंग याची पत्नी हेमा सिंग हिने पीडितेला शहर सोडून जा नाहीतर जिवे ठार मारीन अशी धमकी दिली. शिवीगाळ व दमदाटी करून आपली बदनामी केल्याचेही पीडितेने पोलिसांना सांगितले आहे. संजू श्रीवास्तव हा भाजपचा जिल्हा उपाध्यक्ष असून फिल्म इंडस्ट्रीमध्ये कामगार युनियन चालवत असल्याचे समोर आले आहे. तिन्ही आरोपी फरार आहेत. दरम्यान, भाजपने त्याला पदावरून हटवण्याची कारवाई केल्याची माहिती मिळते आहे.