मनु भाकरने सोडले मौन, ट्रोलर्संना दिले सडेतोड उत्तर

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये दोन कांस्य पदक जिंकणारी नेमबाज मनु भाकरने ट्रोलर्सची बोलती बंद केली आहे. तिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत ट्रोलर्सना खणखणीत प्रत्युत्तर दिले आहे. मनू भाकरने अनेकदा इव्हेंटमध्ये ऑलिम्पिक कास्य पदकांसह दिसल्याने नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केले होते. अशात आता मनूने त्या टीका करणाऱ्या ट्रोलर्संना चांगलेच उत्तर दिले आहे.

वारंवार होणाऱ्या ट्रोलवर आता मनु भाकरने मौन सोडले आहे. आपल्या सोशल मीडिया अकाऊंटच्या माध्यमातून ट्रोल करणाऱ्यांवर पलटवार केला आहे. तिने लिहीले की, ही पदके तिने अभिमानाने घातली होती आणि आपल्या सहकारी हिंदुस्थानीयांसोबत प्रवास शेअर करण्याची ही माझी शैली आहे.

मनु भाकर म्हणाली की, पॅरिस ऑलिम्पिकची 2024मध्ये मिळालेली दुहेरी पदक ही हिंदुस्थानची आहेत. त्यामुळे जेव्हा कुठे मला इव्हेण्टसाठी बोलावले जायचे, त्यावेळी ती पदके अभिमानाने मी दाखवायचे. माझा सुंदर प्रवास शेअर करण्याची ही माझी शैली आहे.

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये हिंदुस्थानची दुसरी पदक विजेती ठरलेल्या मनू भाकरने आपल्या विजयासह इतिहास रचला. मनू भाकर एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकणारी हिंदुस्थानची पहिली नेमबाज ठरली.. याआधी अनेक हिंदुस्थानी खेळाडूंनी वेगवेगळ्या ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकली असली तरी मनूने एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकून आपले नाव रेकॉर्ड बुकमध्ये नोंदवले.