आरक्षणासाठी मराठा आंदोलकांचा तहसील कार्यालयात ठिय्या, कोरे निवेदन दिले

शासनाने मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाची दखल घ्यावी व मराठा समाजास ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी मान्य करावी याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी येथील सकल मराठा समाजाच्या वतीने तहसिल कार्यालयात ठिय्या देण्यात आला. अचानक करण्यात आलेल्या या आंदोलनामुळे महसूल व पोलिस प्रशासनाची तारांबळ उडाली. तहसिलदारांना महिलांच्या हस्ते चक्क कोरे निवेदन देऊन समाजाने आपल्या शासनाप्रति भावना व्यक्त केल्या.

बुधवारी सकाळी 11 च्या सुमारास आंदोलक तहसिलदारांना निवेदन देण्यासाठी मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करीत तहसिल कार्यालयात गेले. महिलांच्या हस्ते त्यांनी निवेदन दिले व तिथेच त्यांनी आपल्या मागण्यांसाठी बैठक दिली. मागण्या मान्य करेपर्यंत कक्ष सोडणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली त्यानंतर मराठा आरक्षणाबाबतच्या सरकारच्या नकारात्मक व वेळकाढू मानसिकतेचा निषेध करीत आंदोलकांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या.

मराठा समाजाच्या प्रगतीसाठी आरक्षण हाच एकमेव पर्याय असून ते घेतल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही असा निर्धार यावेळी आंदोलकांनी प्रशासनासमोर व्यक्त केला. त्यानंतर प्रशासनाच्या वतीने हालचाली सुरू झाल्या. आंदोलकांच्या मागण्या शासनास कळविण्यात येत असल्याने आंदोलन स्थगित करावे असे पत्र महसूल प्रशासनाच्या वतीने आंदोलकांस देण्यात आले. त्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले. आंदोलनादरम्यान तहसिल कार्यालय परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता.