बनावट पास बनवून वॉटर किंगडमला तब्बल 72 लाखांचा गंडा, अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल

बनावट पास बनवून वॉटर किंगडमला तब्बल 72 लाख रुपयांना गंडा घातल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी गोराई पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वॉटर किंगडमच्या एका कर्मचाऱ्याच्या लक्षात ही बाब आली आणि त्यानंतर हा सर्व घोळ उघडकीस आला.

वॉटर किंगडमच्या एंट्री पासची किंमत 1450 रुपये आहे. कंपनीने 2023 मध्ये अधिकृत डीलर्सना 900 रुपयांच्या सवलतीच्या दराने पास ऑफर करत प्रमोशनल स्कीम सुरू केली होती. या स्कीमद्वारे डीलर्सनी पासची विक्री करून प्रत्येक पासवर 100 ते 200 रुपये नफा कमावला.

कंपनीने 2023-24 मध्ये सुरू केलेल्या या योजनेद्वारे सहा अंकी बारकोडवाले 65 हजार गिफ्ट वाऊचर अधिकृत एजंट्सद्वारे विक्री केले. यानंतर 2024-25 मध्ये कंपनीने दुसरी योजना आणली. या योजनेअंतर्गत कंपनीने सात अंकी बारकोडवाले 1 लाख 5 हजार गिफ्ट वाऊचर एकूण 77, 500 एजंट्सना वितरीत केले, अशी माहिती गोराई पोलिसांनी दिली.

2023-24 च्या पासेसवरील बारकोड 9 अंकाने सुरु झाला होता आणि सहा अंकी होता. मात्र बनावट पासवरील बारकोड 9 सुरु झाला आणि सात अंकी होता. 27 ऑगस्ट रोजी वॉटर किंगडमच्या कर्मचाऱ्याच्या बनावट पासचा प्रकार लक्षात आला.

2023 आणि 2024 मध्ये सुमारे 86,572 गिफ्ट व्हाउचर पास वापरले गेले, त्यापैकी 8,700 बनावट असल्याचे आढळून आले. हे बनावट पास एप्रिल 2024 पासून चलनात असल्याचे रेकॉर्डवरून दिसून आले. या 8,700 बनावट पासच्या वापरामुळे वॉटर किंगडमचे 72 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे, असे गोराई पोलिसांच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.

तक्रारदाराच्या लेखी अहवालानंतर, गोराई पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. झोन 11 चे डीसीपी आनंद भोईटे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.