
फ्री भेळपुरी देण्यास नकार दिल्याने दोघांनी भेळ विक्रेत्यावर लोखंडी रॉडने हल्ला केल्याची घटना मालाडमध्ये घडली. या हल्ल्यात भेळ विक्रेता गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणी मालाड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जखमी विक्रेत्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मालाडमधील लिबर्टी गार्डन परिसरात दोघे जण भेळ विक्रेत्याकडे गेले आणि फ्री भेळपुरी मागितली. विक्रेत्याने आधीची उधारी देण्यास सांगितले. याचा राग आल्याने दोघांनी लोखंडी रॉडने विक्रेत्यावर हल्ला केला. यात विक्रेता गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
विक्रेत्याच्या फिर्यादीवरुन मालाड पोलिसांनी एका आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अद्याप आरोपींना अटक करण्यात आली नाही. पोलिस दोन्ही आरोपींचा शोध घेत आहेत.