घोर कलियुग…; वृद्ध जोडप्याच्या पोटगी प्रकरणावर हायकोर्टाची टिप्पणी

देखभालीच्या मुद्द्यावर कायदेशीर लढाईत गुंतलेल्या 75-80 वयोगटातील वृद्ध जोडप्याच्या प्रकरणावर सुनावणी करताना, अलाहाबाद उच्च न्यायालयाने कलियुग आले असल्याचे म्हटले. न्यायमूर्ती सौरभ शमशेरी यांच्या खंडपीठाने मुनीश कुमार गुप्ता यांनी कौटुंबिक न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुनावणी करताना ही टिप्पणी केली.

अलिगडमधील रहिवासी असलेले 80 वर्षीय मुनीश कुमार गुप्ता हे आरोग्य विभागातील पर्यवेक्षक पदावरून निवृत्त झाले. तर त्यांची 76 वर्षीय पत्नी गायत्री देवी यांच्यामध्ये 2018 पासून मालमत्तेवरून वाद सुरू आहे. त्यांचा वाद पोलिसांपर्यंत पोहोचला. या जोडप्याला समुपदेशन घेण्यास पाठविले. मात्र, वाद न निवळल्याने जोडप्याने एकमेकांपासून वेगळे राहण्याचा निर्णय घेतला.

गायत्री देवी यांनी कौटुंबिक न्यायालयात याचिका दाखल करत सांगितले की, मुनीश कुमार यांना सुमारे 35 हजार रूपये पेन्शन असून त्यातील दरमहा 15 हजार रुपये देण्याची मागणी केली. परंतू कौटुंबिक न्यायालयाने 16 फेब्रुवारी रोजी दिलेल्या आदेशानुसार 5 हजार रूपये पोटगी देण्यास सांगितले. यावर पुन्हा पतीने उच्च न्यायालयात आव्हान दिले, या प्रकरणावर आता सुनावणी सुरू आहे.