भाजप खासदार सीपी जोशी यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहून राहुल गांधी यांचा पासपोर्ट रद्द करण्याची मागणी केली आहे. भाजप खासदारांच्या या मागणीवरून काँग्रेसने भाजपला जबरदस्त टोला लगावला आहे. पासपोर्ट देण्याचे किंवा तो रद्द करण्याचे काम ओम बिर्ला करत नाही. लोकसभा अध्यक्षांच्या कार्यकक्षेत हा विषय येत नाही. पासपोर्टबाबतचे अधिकार कोणाला आहेत, हे देखील भाजप नेत्यांना माहित नाही, असा टोला काँग्रेसने भाजपला लगावला आहे.
लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहूल गांधी अमेरिका दौऱ्यावर असताना त्यांनी देशाची बदनामी केली, अशी टीका भाजपकडून करण्यात आली. राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा रोख समजून न घेता असे आरोप करण्यात आले. त्यांच्या वक्तव्याचा विपर्यास करत अयोग्य पद्धतीने ते जनतेसमोर मांडण्यात आले. याचाच आधार घेत भाजप खासदार सीपी जोशी यांनी ओम बिर्ला यांना पत्र लिहून राहुल गांधी यांचा पासपोर्ट रद्द करण्याची मागणी केली आहे. यावरून काँग्रेसने भाजपला टोला हाणला आहे.
काँग्रेस खासदार मनिकम टागोर यांनी म्हटले आहे की, भाजप खासदारही गंमत करतात. भाजप खासदारांनी पासपोर्ट रद्द करण्यासाठी लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहीले आहे. मात्र, पासपोर्ट देणे किंवा रद्द करणे हे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांचे काम नाही. पासपोर्ट देण्याचा आणि तो रद्द करण्याचा अधिकार कोणाला आहे, हेच भाजप खासदारांना माहिती नाही. खासदार बनणे आणि सर्वसामान्य गोष्टींची माहिती ठेवणे या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत, असा टोलाही काँग्रेसने भाजप खासदार सीपी जोशी यांना लगावला आहे.