घोडबंदर रोडच्या बोरिवडेतील विस्तीर्ण मैदानावर पीपीपी तत्त्वावर स्पोर्ट्स क्लब व कन्व्हेंशन सेंटर उभारण्याचा घाट घालण्यात आला आहे. मात्र या प्रकल्पाचा ठाणेकर सर्वसामान्य नागरिकांसाठी आणि खेळाडूंसाठी काहीही फायदा व उपयोग नसल्याने केवळ मूठभर धनदांडग्यांच्या सोयीसाठी सत्ताधाऱ्यांच्या मर्जीतील निश्चित केलेल्या विकासकाच्या भल्यासाठी हा आरक्षित भूखंड हडपण्याचा डाव असल्याचा भंडाफोड शिवसेनेने केला आहे.
बोरिवडे येथील आरक्षण क्रमांक 3 खेळाचे मैदान 95 हजार चौरस मीटर इतके विस्तीर्ण क्षेत्र आहे. या मैदानावर विविध इनडोअर व आऊटडोअर गेम्सची सुविधा असलेले भव्य क्रीडासंकुल बांधण्याकरिता ठाणे महानगरपालिकेने 28 मार्च 2016 रोजी ठराव मंजूर केला होता. मैदानावर क्रीडासंकुल उभारण्यासाठी जोन्स लेंग लॅसल प्रॉपर्टी कन्सल्टंट यांची सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यावेळी त्यांना 25 लाख रुपये सल्लागार फी देण्यात आली. मात्र आता पुन्हा याच कामासाठी मे. अन्स्ट अॅण्ड यंग एलएलपी या ट्रॅन्झेक्शन अॅडव्हायझरी कंपनीची सल्लागार म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. या कंपनीला पहिल्या टप्प्यात 2.50 कोटी तर दुसऱ्या टप्प्यात 3.70 कोटी सल्लागार फी देण्यात येणार आहे. त्यामुळे पूर्वी 25 लाख सल्लागार फी खर्च करून मागवलेल्या अहवालाचे काय, असा प्रश्न शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ओवळा-माजिवडा विधानसभा संपर्कप्रमुख नरेश मणेरा यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला आहे. याआधी महापालिकेने तीन हात नाका येथील रहेजा कॉम्प्लेक्सजवळ पीपीपी तत्त्वावर ठाणे क्लब प्रकल्प उभारण्यात आला होता. मात्र हा प्रकल्प नंतर खासगी विकासकाच्या घशात घालण्यात आला याकडेही मणेरा यांनी लक्ष वेधले.
क्रीडासंकुल व्यावसायिक दृष्टीने चालवणार
95 हजार चौरस मीटर विस्तीर्ण क्षेत्रापैकी 72 हजार 500 चौरस मीटर क्षेत्रावर अंदाजे 418 कोटी खर्च करून आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्पोर्ट्स क्लब व कन्व्हेंशन सेंटर विकसित करण्यात येणार आहे. त्यामध्ये क्रिकेट ग्राऊंड, स्विमिंग पूल, बास्केट बॉल, लॉन टेनिस वगैरे खेळ तर कन्व्हेंशन सेंटरमध्ये सुमारे 10 ते 12 इनडोअर कॉन्फरन्सेस व कन्व्हेंशन सभागृहे, बिझनेस सेंटर, स्क्वॅश, बॅडमिंटन, टेबल टेनिस, इनडोअर स्पोर्ट्स, जिम्नॅशियम, हेल्थ क्लब आणि सुमारे 200 खोल्यांचे हॉटेल व इतर सुविधा असणार आहेत. हे क्रीडासंकुल पीपीपी संस्थेमार्फत शुल्क आकारून व्यावसायिक दृष्टीने चालविण्यात येणार आहे.