म्हाडाचा दिलासा… घरांसाठी जुन्या डोमेसाईलवर अर्ज भरता येणार, पुढील सोडतीपासून होणार अंमलबजावणी

मंगेश दराडे, मुंबई

म्हाडाच्या घरांसाठी इच्छुक असलेल्या अर्जदारांसाठी खूशखबर आहे. घरांसाठी अर्ज भरताना आता जुने म्हणजेच 2018 पूर्वीचे डोमेसाईल प्रमाणपत्र (अधिवास दाखला) तात्पुरते ग्राह्य धरले जाणार आहे. मात्र, घराचा ताबा घेण्यापूर्वी संबंधित अर्जदाराला नवीन डोमेसाईल सादर करणे बंधनकारक असणार आहे. नुकत्याच झालेल्या म्हाडाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत यासंदर्भातला निर्णय घेण्यात आला असून पुढील सोडतीपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. त्यामुळे शेकडो अर्जदारांना दिलासा मिळणार आहे.

म्हाडाच्या घरांसाठी अर्ज भरताना सध्या 1 जानेवारी 2018 नंतर जारी केलेले आणि बारकोड असलेले डोमेसाईल प्रमाणपत्र बंधनकारक आहे. बारकोड असल्यामुळे सिस्टममधून या डोमेसाईल प्रमाणपत्राची पडताळणी करणे म्हाडाला सोपे जाते. अनेक जणांकडे 2018 पूर्वीचे डोमेसाईल प्रमाणपत्र असून आपल्याला त्या डोमेसाईलच्या आधारावर म्हाडाच्या

घरांसाठी अर्ज भरता येईल अशा भ्रमात ते अर्जदार राहतात. ऐनवेळी अर्ज भरताना मात्र त्यांची गोची होते.

नुकतीच म्हाडाची मुंबई मंडळाच्या लॉटरीसाठी अर्ज नोंदणी प्रक्रिया पार पडली. त्यावेळीदेखील अनेकांनी जुने डोमेसाईल प्रमाणपत्र ग्राह्य धरले जावे, अशी मागणी म्हाडाकडे केली होती.

म्हाडाच्या घरांसाठी अर्ज भरताना अर्जदार आता जुने डोमेसाईल प्रमाणपत्र अपलोड करू शकणार आहेत. नुकत्याच झालेल्या बैठकीत यासंदर्भातील निर्णय घेण्यात आला असून पुढील सोडतीपासून याची अंमलबजावणी होईल. संबंधित अर्जदार विजेता झाल्यानंतर त्याला ठरावीक दिवसांची मुदत दिली जाईल आणि त्या मुदतीत त्याला बारकोड असलेले नवीन डोमेसाईल प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असेल.

– अनिल वानखेडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, म्हाडा

कमी कालावधीत नवीन डोमेसाईल काढण्यासाठी अनेकजण एजंटकडे धाव घेतात. एजंटदेखील लोकांची गरज लक्षात घेऊन डोमेसाईल प्रमाणपत्रासाठी 2 ते 6 हजार रुपयांची मागणी करतात.