बदलापूरमध्ये चिमुकलींवर झालेल्या अत्याचार प्रकरणातील नराधमाचे एन्काऊंटर या प्रकरणात अडकलेल्या मिंध्यांच्या बड्या धेंडांना वाचवण्यासाठी केले का? असा सवाल शिवसेना नेते–युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केला आहे. खरे तर आरोपीला भरचौकात फाशी द्यायला हवी होती, असेही ते म्हणाले. या कृत्याविरोधात आणि आरोपीला शिक्षा करण्यासाठी बदलापूर स्थानकात ठिय्या मांडणाऱ्या आंदोलकांवरील गुन्हे मागे कधी घेणार, असा सवालही आदित्य ठाकरे यांनी आज केला.
बदलापूरमधील अत्याचाऱ्याच्या घटनेतील आरोपीच्या एन्काऊंटरबद्दल अनेकांकडून संशय व्यक्त करण्यात येत आहे. एन्काऊंटर झालेल्या प्रसंगी आरोपीच्या हातात बेड्या होत्या का?, चेहऱ्यावर बुरखा होता का? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. पोलीस व्हॅनच्या त्या डब्यात नक्की काय घडले, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. या घटनेनंतर एफआयआर घेण्यास पोलासांनी सात दिवस लावले. याला जबाबदार असणाऱ्यांना वाचवण्यासाठी एन्काऊंटर तर केले नाही ना, असेही आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. शिवाय या घटनेकडे दुर्लक्ष करणारे संबंधित शाळा प्रशासनाचा आपटे याला वाचवण्याचा प्रयत्न सुरू आहे का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
पुतळ्यापेक्षा हेलिपॅडवर खर्च
मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कोसळलेल्या पुतळ्यापेक्षा पुतळ्याच्या उद्घाटनप्रसंगी मोदींच्या हेलिपॅडसाठी जास्त खर्च होता, असे आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले. गुजरातमध्ये उभारलेला स्टॅच्यू ऑफ युनिटीचा पुतळा सुस्थितीत आहे, मात्र महाराष्ट्रात उभारलेला शिवरायांचा पुतळा कोसळतो, असा टोलाही त्यांनी लगावला.
वामन म्हात्रेला अटक कधी करणार?
बदलापूर आंदोलनाचे वार्तांकन करणाऱ्या महिला रिपोर्टरला मिंधे गटाचा पदाधिकारी वामन म्हात्रे याने, ‘तू अशा बातम्या करतेयस, जणू तुझ्यावर बलात्कार झालाय’ अशा शब्दांत हिणवले. याप्रकरणी म्हात्रेवर विनयभंग आणि अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला मग म्हात्रेला अटक कधी करणार, त्या शाळेचे ट्रस्टी कुठे आहेत, असा सवाल त्यांनी केला.