भुयारी मेट्रोने प्रवास करण्याचे मुंबईकरांचे स्वप्न आता लवकरच पूर्ण होणार आहे. कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो- 3 मार्गातील आरे ते बीकेसी या 12.44 किमी लांबीच्या पहिल्या टप्याचे काम पूर्ण झाले आहे. सध्या मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून या प्रकल्पाची तपासणी सुरू असून लवकरच अंतिम सुरक्षा प्रमाणपत्र मिळेल. त्यानंतर ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून भुयारी मेट्रो मुंबईकरांच्या सेवेत हजर होईल. पहिल्या टप्प्यात एकूण दहा स्थानके असून 9 मेट्रोमार्फत दिवसाला 96 फेऱ्या चालविल्या जातील. दहा रुपयांपासून ते 50 रुपयांपर्यंत तिकीट दर आहेत.
मुंबई मेट्रो-3 च्या कुलाबा-वांद्रे-सीप्झ या 33.5 किमीच्या मार्गिकेचे काम मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन करीत आहे. या मार्गावर एकूण 27 मेट्रो स्थानके असून त्यातील 26 स्थानके भूमिगत आहेत. यातील आरे ते बीकेसी या 12.44 किमी लांबीच्या मार्गिकेचे काम पूर्ण झाले आहे. मुंबई उपनगरातील वाहतूककोंडी फोडण्यासाठी हा टप्पा महत्त्वपूर्ण असून ) दिवसाला साडेचार लाख प्रवासी मेट्रोने ये-जा करतील, असा एमएमआरसीएलला अंदाज आहे. सुरुवातीला आठ डब्यांच्या नऊ मेट्रोच्या माध्यमातून दिवसाला 96 फेऱ्या चालविल्या जाणार आहेत. सकाळी 6.30 ते रात्री 10.30 या वेळेत दर साडेसहा मिनिटाला एक गाडी सुटेल. रविवारी आणि सुट्टीच्या दिवशी केवळ 48 फेऱ्या चालविल्या जाणार असून पहिली मेट्रो सकाळी 8.30 वाजता धावणार आहे.
अशी असणार स्थानके
आरे डेपो, सीप्झ, अंधेरी एमआयडीसी, मरोळ नाका, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ टी-2, सहार रोड, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ टी-1, सांताक्रुझ मेट्रो, वांद्रे कॉलनी, वांद्रे-कुर्ला संकुल.
बुलेट ट्रेनशी कनेक्ट करणार
मेट्रो-3 चे बीकेसीमधील स्थानक आणि बीकेसीमधील बुलेट ट्रेनचे स्थानकाचे अंतर दीड किलोमीटर दूर आहे. यातच बीकेसीतील काही कार्यालयांनी भूमिगत मेट्रोला थेट जोडण्याचे प्रस्ताव दिले आहेत. त्यानुसार मेट्रो-3 आणि बुलेट ट्रेन पादचारी मार्गाने जोडण्याचा प्रस्ताव एमएमआरसीने नॅशनल हायस्पीड रेल कोर्पोरेशनला दिला आहे.
काही तांत्रिक कारणामुळे भुयारी मेट्रो बंद झाल्यास प्रवासी मेट्रोमध्ये अडकून पडणार नाहीत. प्रवाशांना मोटरमन आणि मागील बाजूने गाडीतून उतरून टनेलमधून पुढील स्थानक गाठता येणार आहे. त्यासाठी मेट्रो ट्रकमधून वॉक वे तयार करण्यात आला आहे.
बीकेसी ते कफ परेड मार्चपासून
मेट्रो-3 चा बीकेसी ते कफ परेड या 21 किमी लांबीच्या दुसऱ्या टप्प्याचे 93 टक्के काम पूर्ण झाले आहे. दुसरा टप्पा मार्च 2025 पासून मुंबईकरांच्या सेवेत येईल, असे मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांनी सांगितले. मेट्रोचे दोन्ही टप्पे प्रवाशांच्या सेवेत दाखल झाल्यानंतर दिवसाला 13 लाख प्रवासी मेट्रोतून प्रवास करतील, असा अंदाज आहे.