Badlapur Protest : आंदोलकांवरील गुन्हे केव्हा मागे घेणार? आदित्य ठाकरे यांचा मिंधे सरकारला सवाल

बदलापूर येथील एका नामांकित शाळेत दोन चिमुरड्यांवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी नराधम अक्षय शिंदे याचा पोलिसांनी सोमवारी एन्काऊंटर केला. दरम्यान या प्रकरणात अडकलेल्या भाजपच्या बडय़ा धेंडांना वाचवण्याकरिता पुरावा नष्ट करण्यासाठी अक्षयचे एन्काऊंटर करण्यात आले का? गृह खात्याचा एकूण कारभारच यामुळे संशयाच्या भोवऱ्यात सापडल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

दरम्यान बदलापूरमध्ये एका महिला पत्रकाराला तुझ्यावरच बलात्कार झाला का असा प्रश्न करणाऱ्या मिंधे गटाचा नेता वामन म्हात्रे याने या एन्काऊंटरनंतर बदलापूर स्थानकात मिठाई वाटली. त्यावरून आदित्य ठाकरे यांनी मिंधे सरकारला फटकारले आहे. ”एकतर ही एक चोर मिंधे गँग आहे. दुसरं म्हणजे जी व्यक्ती मिठाई वाटतेय तिने एका महिला पत्रकाराला विचारले की ती अशा प्रकारे रिपोर्टिंग करतेय जसं काही तिचाच बलात्कार झालाय. हा व्यक्ती तुरुंगात असायला हवा होता”, असे ट्विट आदित्य ठाकरे यांनी केले आहे.

तसेच आदित्य ठाकरे यांनी बदलापूरमधील आंदोलकांवर दाखल केलेल्या गुन्ह्यांवरून देखील मिंधे सरकारला फटकारले आहे. ”मिंधे सरकारच्या घटनाबाह्य मुख्यमंत्र्यानी जवळपास आठवडाभरा या प्रकरणात गुन्हा दाखल करू नका असे आदेश दिले होते. तर ज्या आंदोलकांनी न्यायासाठी आंदोलन केले त्यांना या मिंधे सरकारने गँगस्टर सारखी वागणूक दिली. त्यांच्यावरचे गुन्हे कधी मागे घेतले जाणार आहेत”, असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला आहे.

वामन म्हात्रे प्रकरण नेमके काय आहे?

शाळकरी मुलींवरील लैंगिक अत्याचाराच्या घटनेतील आरोपीवर पोलिसांनी वेळीच कारवाई केली नाही. याचा निषेध करण्यासाठी 20 ऑगस्टला नागरिकांनी आंदोलन केले. त्याचे वार्तांकन करणाऱ्या पत्रकार महिलेला वामन म्हात्रेने ‘तू अशा बातम्या करतेस, जणू काही तुझ्यावरच बलात्कार झाला आहे’ असे अर्वाच्च शब्द वापरले. याप्रकरणी म्हात्रेविरुद्ध विनयभंग आणि अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.