गणेशोत्सवात देवगड आगाराची बक्कळ कमाई, 17 लाख 72 हजार 619 रुपये कमावले

गणेशोत्सव काळात मुंबईकर चाकरमानी गणेश भक्त, प्रवासी वर्गाची देवगड तालुक्यात येण्याची व परतीच्या प्रवासाची सुयोग्य विना अपघात सेवा देवगड आगाराने पार पाडली आहे. देवगड तालुक्यात देवगड आगाराने गणेश भक्तांकरीता येण्याकरता 17 फेऱ्या आणि परतीच्या प्रवासाकरिता 46 जादा फेऱ्यांचे नियोजन करून एकूण 63 फेऱ्या द्वारे 17 लाख 72 हजार 619 रुपये एवढे उत्पन्न 53 हजार 447 किलोमीटर मधून प्राप्त केले आहे.

गणेशोत्सव काळात देवगड आगाराने मुंबईकर चाकरमानी गणेश भक्तांना भावी आणण्यासाठी 17 जादा गाड्या डोंबिवली 16 व विठ्ठलवाडी 1 अशा पद्धतीने नियोजन केले होते. तसेच परतीच्या प्रवासाकरता एकूण जादा 46 गाड्या देवगडहून बोरीवली, मुंबई सेंट्रल, कुर्ला नेहरूनगर,विरार, विठ्ठलवाडी पुणे या मार्गावर रवाना करण्यात आल्या. यात प्रामुख्याने देवगड बोरीवली मार्गावर 25 जादा गाड्या , मुंबई सेंट्रल 8 गाड्या, कुर्ला नेहरू नगर 9 गाड्या, विरार 1 गाडी विठ्ठलवाडी 2 गाड्या पुणे 1 गाडी या पद्धतीने प्रवासी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. या व्यतिरिक्त देवगड आगाराची नियमित देवगड बोरीवली प्रवासी फेरी तसेच देवगड नालासोपारा ही प्रवासी फेरी मधून प्रवासी वर्गाची सोय नियमित करण्यात आली.

रापम सिंधुदुर्ग विभाग नियंत्रक अभिजीत पाटील, विभागीय वाहतूक अधिकारी विक्रम देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली देवगड आगार व्यवस्थापक विजय कुमार घोलप स्थानक प्रमुख निलेश लाड वाहतूक निरीक्षक श्रीकांत सैतावडेकर ,सहाय्यक वाहतूक निरीक्षक गंगाराम गोरे ,वाहतूक नियंत्रक तुकाराम देवरुखकर, बी. एस. जाधव, ए. व्हीं कदम,गुरुनाथ हडकर, लक्ष्मण बोगार, दिनेश साळकर, वाहन परीक्षक दिनकर उर्फ अण्णा प्रभू मिराशी, संजय राऊत, संतोष शिंदे तसेच कार्यशाळा अधीक्षक सर्व कार्यशाळा कर्मचारी, चालक वाहक, या सर्वांनी गणेशोत्सव काळात प्रवासी सेवा यशस्वीपणे पार पाडण्याकरता मोलाची कामगिरी बजावली.