भाईंदरच्या नयानगरमधील गुन्हेगारीला बसणार चाप; 148 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची करडी नजर

चोरी, घरफोडी, हत्या, मारहाण, चेन स्नॅचिंग अशा गुन्हेगारी पाश्र्वभूमीतील गुन्हेगारांचे आश्रय घेण्याचे ठिकाण म्हणून नयानगरची ओळख आहे. अनेकदा लपलेल्या गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांना कोम्बिंग ऑपरेशन करावे लागते. मात्र आता या चोरट्यांचा शोध घेणे सोपे होणार आहे. कारण या ठिकाणी 148  सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले असून त्यांच्या मदतीने पोलीस या गुन्हेगारांवर करडी नजर ठेवणार आहेत. त्यामुळे नयानगरमधील गुन्हेगारीला चाप बसणार आहे.

मीरा-भाईंदर परिसरात महापालिका व पोलिसांच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची संख्या कमी असल्याने गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी पोलिसांची चांगलीच दमछाक उडते. अनेक वेळा पोलिसांना खासगी सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा वापर करून आरोपींचा शोध घ्यावा लागतो. शहरातील गुन्हेगारीला आळा बसावा यासाठी तत्कालीन महविकास आघाडी सरकाने मूलभूत सोयीसुविधांच्या विकासांतर्गत 2 कोटी 60 लाख रुपये निधी मंजूर करून 148 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासाठी मंजुरी दिली होती. त्याकरिता महापालिका आयुक्त संजय काटकर यांनी मान्यता दिली होती. आता हे कॅमेरे बसवण्याचे काम पूर्ण झाले असून ते थेट नयानगर पोलीस ठाण्यात जोडले गेले आहेत. तसेच महापालिकेतील मुख्य सीसीटीव्ही नियंत्रण कक्षाला जोडले जाणार असून हे सीसीटीव्ही कार्यान्वित करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत.

गाड्यांच्या नंबरप्लेटची ओळख पटवणार

नयानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकूण 137 बुलेट कॅमेरे बसवण्यात आले आहेत. याव्यतिरिक्त सहा ऑटोमॅटिक नंबरप्लेट ओळख पटवणारे म्हणजेच एएनपीआर आणि पाच 360 डिग्री रोटेट म्हणजेच पीटीझेड या कॅमेऱ्यांचादेखील समावेश आहे. एएनपीआर आणि पीटीझेड हे दोन्ही कॅमेरे हायटेक पद्धतीचे असून या कॅमेऱ्यांच्या मदतीने रात्रीच्या अंधारातसुद्धा गुन्हेगारांवर नजर ठेवणे सोपे जाणार आहे. नयानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मुख्य रस्त्यांसह प्रत्येक सिग्नल, रहदारीच्या ठिकाणी, रेल्वे स्टेशन व हॉस्पिटल परिसरात हे सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत.