
नेरळमध्ये तीन कॉलेज तरुणांना सुसाट कारने चिरडल्याची घटना ताजी असतानाच चिंचपाडा येथे भरधाव टेम्पोने दोन विद्यार्थ्यांना चिरडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही धडक इतकी भयंकर होती की एका विद्यार्थ्याचा टेम्पोखाली चिरडून जागीच मृत्यू झाला. सुधीर पुंजाराम असे मृत विद्यार्थ्यांचे नाव आहे तर सनी तांबडा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पोलिसांनी फरार टेम्पोचालकाला ताब्यात घेतले आहे.
तवा येथील कॉलेज सुटल्यानंतर सुधीर पुंजाराम आणि सनी तांबडा हे दोघे रस्त्याने चालत घरी जात होते. यावेळी गुजरातहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव टेम्पोने दोघांना जोरदार धडक दिली. अंगावरून गाडी गेल्याने सुधीरचा जागीच मृत्यू झाला. सुधीर तवा येथील आश्रम शाळेत बारावी सायन्समध्ये शिकत होता तर सनीला गंभीर दुखापत झाल्याने त्याला प्रथम कासा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी वेदांत रुग्णालयात त्याला हलवण्यात आले. टेम्पोचालकावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापपर्यंत सुरू होती.
गुन्हे दाखल करा
मुंबई-अहमदाबाद महामार्गावर सिमेंट काँक्रीटचे काम सुरू आहे. त्यातच महामार्गावरील रस्त्याची चाळण झाली आहे. जागोजागी पडलेल्या खड्ड्यांमध्ये तोल जाऊन अपघाताचे प्रमाण वाढले आहे. आजच्या दुर्घटनेतील बळीला महामार्ग प्राधिकरण आणि ठेकेदाराचा भोंगळ कारभार जबाबदार असल्यामुळे त्यांच्यावर गुन्हे दाखल करा, अशी मागणी डहाणूवासीयांनी केली आहे.