कामोठ्यात चोरट्यांनी कारचे टायरच पळवले

घरफोड्या, चेन स्नॅचिंग, लुटपाटच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असताना कामोठ्यात आता हात की सफाईचा नवीन फंडा भामट्यांनी अजमावला आहे. या चोरट्यांनी चक्क कारचे टायरच पळवल्याची बाब उघडकीस आली आहे. या चोरट्यांनी रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कारचे मागील दोन्ही टायर काढून घेतले आणि पोबारा केला. याप्रकरणी कामोठे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

कामोठे येथील सेक्टर 19 मधील प्रेसिडेन्सी हाऊसिंग सोसायटीमध्ये राहणारे विनायक शिराळकर हे लेखापरीक्षक म्हणून काम करतात. त्यांनी एमएच 02 सीबी 1633 ही व्हॅगनार कार सोसायटीजवळील रस्त्यावर पार्क करून ठेवली होती. चोरट्यांनी अंधाराचा फायदा घेऊन चोरी करण्याच्या उद्देशाने गाडीचा लॉक तोडला. गाडीतले सगळे सामान अस्ताव्यस्त केले, पण यावेळी चोरट्यांच्या हाती काहीही लागले नाही. त्यानंतर चोरट्यांनी गाडीतल्या जॅकचा वापर करून मागचे दोन्ही टायर काढले आणि पोबारा केला. विनायक सकाळी कामानिमित्त घराबाहेर पडले तेव्हा त्यांना गाडीचे टायर चोरट्यांनी पळवल्याचे लक्षात आले.

भामटे सीसीटीव्हीमध्ये कैद

कामोठे पोलिसांनी घटनास्थळाजवळील परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने या चोरट्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. हे चोरटे जवळच असलेल्या एका सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले आहेत. हे सराईत चोरटे असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. त्यांनी यासारखे आणखी काही गुन्हे केले आहेत का याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे.