
पालिका प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे भिवंडीतील सर्वच रस्त्यांची अक्षरशः दैना झाली आहे. गणेश विर्सजनासाठी जाणाऱ्या नागरिकांचा संतापाचा भडका उडू नये म्हणून पालिकेने रस्त्यांची डागडुजी केली. मात्र खड्ड्यांमध्ये डांबर टाकण्याऐवजी अनेक ठिकाणी मातीमिश्रित लोटलेली खडी काही दिवसांतच उखडली असून अवजड वाहतुकीमुळे प्रचंड धुरळा उडत आहे. ही धूळ प्रवाशांच्या नाका-तोंडात जाऊन त्यांना श्वसन व डोळ्यांचे विकार होऊ लागले आहेत. त्यामुळे कंबरतोड प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या मागे आता नवीनडोकेदुखी चालू झाली आहे.
भिवंडी महापालिकेने कोट्यवधी खर्च करून पावसाळ्याआधी रस्त्यांची दुरुस्ती केली. मात्र जुलै, ऑगस्ट महिन्यात पडलेल्या धुवांधार पावसाने शहरातील दुरुस्त केलेल्या रस्त्यांची अक्षरशः दाणादाण उडाली. त्यानंतर महापालिकेने पुन्हा मुख्य रस्त्यांची डागडुजी केली. मात्र खड्ड्यांमध्ये लोटलेली माती काही दिवसांतच निघाली आणि शहरातील रस्त्यांवर खड्ड्यांचे जाळे निर्माण झाले. त्यामुळे नालापार, खोका कंपाऊंड, 72 गाळा, बाबला कंपाऊंड ते अमजदिया रोड, जब्बार कंपाऊंड, गोविंदनगर रावजीनगर, चाविंद्रा रोड, गायत्रीनगर मानसरोवर रोड, फेनापाडा, सोनाळे भादवड, ताडाळी, कामतघर रस्ता, आसबीबी खदान रोड, धामणकर नाका ते मंडई, अंजूर फाटा चिंचोटी, भिवंडी वाडा रस्त्यांवर प्रचंड धुळीचे लोट दिसत आहेत. वाहनचालकांनी धुळीमुळे समोरचे दिसेनासे होत असल्याने अपघाताची शक्यता आहे.
आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
रस्त्यावरून दररोज प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसह प्रवाशांचेही आरोग्य धोक्यात आले आहे. श्वसनविकार, दम्याचे आजार, सर्दी-खोकला, घशाचे विकार व डोळ्यांचे विकार, मणक्याचे आजार बळावत आहेत. यामुळे प्रवाशांचा आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.