अतिकालीन भत्त्याचा प्रलंबित प्रश्न मार्गी लागणार; म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेच्या प्रयत्नांना यश

म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेच्या प्रयत्नांमुळे पालिकेतील सुरक्षारक्षकांना दिलासा मिळाला असून प्रलंबित अतिकालिन भत्त्याचा (ओ.टी.) प्रश्न मार्गी लागणार आहे. तसेच यापुढे -अतिकालिन भत्ता काढताना हाताने नोंदी न करता संपूर्णपणे संगणकीय पध्दतीचा वापर करण्यात येणार आहे.

पालिका मुख्यालयात अत्यावश्यक सेवेत काम करणारे सुरक्षारक्षक पालिका उपायुक्त, अतिरिक्त आयुक्त यांच्या विविध ठिकाणच्या भेटीदरम्यान त्यांना सुरक्षा पुरवण्याचे काम करतात. मुख्यालयातील सुरक्षा रक्षकांची 36 शेडय़ूल पदे रिक्त असल्याने या सुरक्षारक्षकांना कामाच्या गरजेनुसार वेळोवेळी ओ.टी. करावा लागतो. असे असतानाही या सुरक्षारक्षकांचा जानेवारी 2023, एप्रिल 2023  ते मार्च 2024 या 13 महिन्यांच्या कालावधीतील अतिकालिन भत्ता लेखाधिकारी कार्यालयाच्या अनास्थेमुळे प्रलंबित होता. सुरक्षा रक्षकांना प्रलंबित अतिकालिन भत्ता तत्काळ मिळावा यासाठी संयुक्त बैठकीचे आयोजन करण्यात यावे अशी मागणी म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे अध्यक्ष बाबा कदम यांनी पालिका उपायुक्तांकडे केली होती. त्यानुसार झालेल्या बैठकीत सुरक्षारक्षकांचा प्रश्न मार्गी लागला आहे.

डय़ुटीवर येताना सुरक्षारक्षक 1 मिनिट ते 29 मिनिट उशिरा आला तर त्याचा अर्धा तास व 31 मिनिट ते 60 मिनिट उशिरा आला तर एक तास कापण्यात येत होता. यापुढे अतिकालिन भत्ता काढताना जेवढे मिनिट उशीर होईल तेवढेच मिनिट अतिकालिन भत्ता काढताना कापावे असा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच अतिकालिन भत्ता काढताना हाताने नोंदी न करता संपुर्णपणे संगणकीय पध्दतीचा वापर करण्याचा निर्णय घेतल्याने आता सुरक्षा रक्षकांचा अतिकालिन भत्ता प्रलंबित राहणार नाही अशी माहिती म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे उपाध्यक्ष डॉ. संजय कांबळे – बापेरकर यांनी दिली.