
महाविकास आघाडीच्या बाजूने संपूर्ण महाराष्ट्रात वातावरण सकारात्मक आहे. असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी धुळे शहरात आयोजित शिवस्वराज्य यात्रेमध्ये बोलताना म्हटले आहे. राज्यातील त्रिकुट सरकारचे काळ्या कारनाम्यांचा जनतेपुढे ‘शिवस्वराज्य यात्रा’च्या माध्यमातून पर्दाफाश करण्यात येत आहे.
त्रिकुट सरकारने योजनांचा पाऊस सुरू केला आहे. अनेक विकास कामे हाती घेतले आहेत. मात्र ते पूर्ण करण्यासाठी तिजोरीत पैसाच नाही. ठेकेदारांची देणी सरकारने थकवली आहे. त्यामुळे ठेकेदारांच्या आत्महत्यांचे प्रमाण राज्यात वाढले का? अशी भीती आहे. कोट्यवधी रुपयांचे कार्यक्रम राज्यभर त्रिकुटाकडून घेतले जात आहेत. आम्ही मात्र लोकवर्गणीतून आपल्याशी संवाद साधत आहोत. कुठे इंद्राचा ऐरावत आणि कुठे आम्ही मात्र यांच्याकडे इतके पैसे कुठून येतात, सरकारी अधिकाऱ्यांना वेठीस धरून सभा कशा घेतल्या जातात? आमच्या अंगणवाडी सेविकांना धमकावून सभेस गर्दी केली जाते. असे जयंत पाटील म्हणाले.
धुळे जिल्ह्यात अल्पसंख्यांक समाज मोठ्या प्रमाणात राहतो. अशा भागात दंगली घडविण्याचे षडयंत्र आखले जात आहे. काल आमचा दोंडाईचा शहरात कार्यक्रम होता, त्या शहरात वातावरण कलुशित करण्याचा प्रयत्न झाला. ज्यांच्या हातात दांडके होते, दगड होते त्यांना अटक न करता, प्रत्यक्षात घटनास्थळी उपस्थित नसणाऱ्यांवर केसेस करण्यात आल्या. सरकार जाणार ही भीती निर्माण झाल्यामुळे धार्मिक, जातीय दंगली पेटविण्याचा त्यांचा शेवटचा प्रयत्न सुरू आहे. मात्र हे यशस्वी होऊ द्यायचे नाही. आपल्याला एकजुटीने ही लढाई जिंकायची आहे. असेही जयंत पाटील यानी स्पष्टपणे सागितले आहे.
महाराष्ट्राच्या तिजोरीची होळी करून सत्तेची दिवाळी -डॉ. अमोल कोल्हे
महाराष्ट्राच्या तिजोरीची होळी करून सत्तेची दिवाळी साजरी करण्याचे काम महायुती सरकार करत असल्याचा हल्ला खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी सरकारवर केला. महाराष्ट्रात युवकांच्या रोजगाराचा हक्क मारला जातोय. महाराष्ट्रातील उद्योगधंदे हिरावून घेतले जात आहेत. असे अमोल कोल्हे म्हणाले.
याप्रसंगी महिला प्रदेशाध्यक्षा अॅड. रोहिणी खडसे, युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, सामाजिक न्याय विभागाचे राज्यप्रमुख पंडीत कांबळे, कामराज निकम, जिल्हाध्यक्ष जितेंद्र मराठे, शहर जिल्हाध्यक्ष रणजित राजे भोसले, जितेंद्र ठाकूर, संदीप बेडसे, माजी महापौर कल्पना महाले, निरीक्षक उमेश पाटील, बापूसाहेब चौधरी, शालीराम माळकर, जोसेफ मलबारी, डॉ. विशाल दळवी, संजय पाटील, माजी आमदार दिलीप सोनवणे, सयाजी ठाकरे, नरेंद्र मराठे, अण्णा सूर्यवंशी, सुनील महाले, भोला शेंगदाणे, वाल्मिक मराठे व राजु चौधरी यांच्यासह इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आयोजित शिवस्वराज्य यात्राला राज्यात मोठ्या प्रमाणात जनतेचा प्रतिसाद मिळत आहे. उद्या 24 सप्टेंबर रोजी शिवस्वराज्य यात्रा नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी, चांदवड, येवला या ठिकाणी जाहीर सभा होणार आहे.