तिरुपती लाडू वाद : मंदिरासाठी तूप पुरविणाऱ्या डेअरीला केंद्राची कारणे दाखवा नोटीस

तिरुपती बालाजी मंदिरातील लाडूच्या प्रसादात प्राण्यांची चरबी वापरल्याच्या आरोप आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी केला आणि देशभरात संतापाचे वातावरण पसरले. आता देशातील अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (एफएसएसएआय) तिरुपती मंदिराला तूप पुरविणाऱ्या एआर डेअरीला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

एनडीडीबी काफ या एका खासगी प्रयोगशाळेत चाचणी केली असता लाडूमध्ये वापरल्या जाणाऱ्या तुपाच्या नमुन्यांमध्ये प्राण्यांची चरबी, फिश ऑईल, बीफ टॅलो आणि डुकराची चरबी आढळून आल्याने एआर डेअरीची तपासणी करण्यात आली. तिरुमला तिरुपती देवस्थानाला तूप पुरवठा करणाऱ्या एआर डेअरीने भेसळीचे आरोप फेटाळले आहेत आणि प्रयोगशाळेच्या निष्कर्षांना आव्हान देत आहे. दरम्यान एआर डेअरीने त्यांच्यावरील आरोप फेटाळले असून मंदिराला दररोज 10 टन तूप लागते. त्यातील 0.1 टक्केही तूप आम्ही मंदिराला दिलेले नसल्याचा दावा केला आहे.

तिरुमला तिरुपती देवस्थानचे कार्यकारी अधिकारी जे श्यामला राव यांनी सांगितले की, मंदिर मंडळाने AR Dairy Food Pvt Ltd ला काळ्या यादीत टाकले आहे आणि कथितरित्या भेसळयुक्त तूप पुरवल्याबद्दल त्याच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू केली आहे.

काय आहे प्रकरण?

तिरुपती मंदिरात प्रसादाचे लाडू बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या तुपात प्राण्यांची चरबी, फिश ऑईल, डुकराची चरबी, बीफ फॅटचे अंश असल्याचा आरोप आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी केला आणि देशभरात संताप उसळला.