इस्त्रायलने लेबनॉनवर रॉकेट डागले, 182 हून अधिक लोकांचा मृत्यू

लेबनॉनमध्ये पेजर आणि वॉकी टॉकी स्फोटानंतर इस्त्रायलने आता हिजबुल्लाहसोबत युद्ध छेडले आहे. सोमवारी इस्त्रायलने 300 हून अधिक हिजबुल्लाहच्या ठिकाणांवर हवाई हल्ले केले. या हल्ल्यात 182 लोकांचा मृत्यू झाला होता तर 727 हून अधिक लोक जखमी झाले होते. लेबनॉनच्या आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, मृतांमध्ये महिला आणि मुलांचा समावेश आहे. हवाई हल्ल्यात दक्षिण आणि ईशान्य लेबनॉनच्या मोठ्या भागांना लक्ष्य केले आहे.

या हल्ल्यानंतर इस्त्रायली सेनेने सांगितले की, त्यांनी हिजबुल्लाह दहशतवादी समुहाविरोधात लेबनॉनच्या 300 ठिकाणांवर हल्ला केला. सेनेने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर हल्ल्याची आधीच घोषणा केली होती. सेना प्रमुख लेफ्टनेंट जनरल हर्जी हलेवी यांचे स्टेटमेण्ट शेअर करत सांगितले होते की, इस्त्रायल आता लेबनॉनवर आणखी हल्ला करण्यासाठी तयार आहे. ही हिजबुल्लाहविरोधात कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. 

इस्रायलच्या लष्करी प्रवक्त्याने सांगितले की, ते बेका येथील हिजबुल्लाहच्या स्थानांवर हल्ला करण्याची तयारी करत आहेत. हिजबुल्लाहने लेबनॉनच्या बेका खोऱ्यातील घरांमध्ये शस्त्रास्त्रांचा साठा लपवून ठेवला आहे. नागरिकांनी तेथून तातडीने निघून जावे.