ठाण्यात डान्स बार, पब, हुक्का पार्लर तेजीत

शहरात डान्स बार, पब, हुक्का पार्लर, अमली पदार्थ विक्री आणि सेवन करणारे अवैध धंदे सध्या तेजीत सुरू आहेत. पावसाळी अधिवेशनात ठाण्यातील या अवैध धंद्यांवर चर्चा होऊ नये म्हणून चार दिवसांची कारवाईची नौटंकी करण्यात आली. मात्र अधिवेशन संपताच कारवाई गुंडाळण्यात आली. शहरात रात्रभर पुन्हा धिंगाणा सुरूच असून पालिका, पोलिसांच्या कारवाईचा फक्त धूरच पाहायला मिळत आहे.

पुण्यातील पोर्शे कार प्रकरण त्यानंतर सतत तरुणाईमध्ये अमली पदार्थ सेवनाच्या घटना समोर आल्यानंतर राज्यातील मिंधे सरकारने पावसाळी अधिवेशनापूर्वी ठाण्यातील अवैध धंद्यांवर कारवाईचे आदेश दिले. ठाणे पालिकेच्या अतिक्रमण विभागातील अधिकाऱ्यांनी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी बुलडोझर, पोकलेन घेऊन कारवाईला सुरुवात केली. त्यानंतर वागळे, उपवन, घोडबंदर आणि शहरातील इतर ठिकाणी अवैध धंद्यांवर कारवाई करण्यात आली. मात्र शहरात पुन्हा नंगानाच सुरू झाला असल्याने ठाणे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. रात्री 2 वाजेपर्यंत पोलिसांच्या नाकावर टिच्चून अवैध धंदे सुरू असूनदेखील कारवाई होत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. दरम्यान सुसंस्कृत ठाणे शहारत अवैध धंद्यांनी पुन्हा डोके वर काढले असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

पानटपऱ्या पुन्हा थाटल्या

शाळा, महाविद्यालय परिसरात 100 मीटर अंतराच्या आत असलेल्या पानटपऱ्या सील करण्यात आल्या तर अमली पदार्थ विक्री करणाऱ्या टफ्ऱ्यांवर तोडक कारवाई करण्यात आली होती. या कारवाईत एकूण 31 पानटपऱ्या जप्त करण्यात आल्या. मात्र आता पानटपऱ्या पुन्हा थाटल्या गेल्याचे दिसून येत आहे.

येथे सुरू आहेत अवैध धंदे

सूरसंगीत, टोपाज – उपवन, अँटिक पॅलेस तीन पेट्रोल पंप, सीझर पार्क, मुलुंड चेकनाका, एन्जल – तीन हात नका, आम्रपाली – मासुंदा तलाव तर कोठारी कंपाऊंड येथील दि सिक्रेट, एम एच 04 , ऑरेंज मिंट.