आंध्र प्रदेशातील तिरुपती बालाजी मंदिरात भाविकांसाठी तयार करण्यात आलेल्या ‘प्रसादम’मध्ये प्राण्यांची चरबी मिसळल्याच्या बातमीमुळे सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. त्यामुळे आता मथुरेमधील अन्न व औषध प्रशासन विभाग (FSDA) सक्रिय झाला. मात्र, आता समाजवादी पक्षाच्या खासदार डिंपल यादव यांनी मथुरेतील वृंदावनमधील प्रसादाच्या दर्जावर अनेक प्रश्न उपस्थित केले आहे.
तिरुपतील बालाजी मंदिराच्या प्रसादाच्या भोंगळ कारभारानंतर आता मथुरेतील प्रसादावर सपा खासदार डिंपल यादव यांनी निशाणा साधला. तिरुपतीनंतर वृंदावनमध्ये प्रसादात योग्य दर्जाचा खवा वापरला जात नसल्याचा अनेक गोष्टी कानावर पडत आहेत. त्यामुळे याकडे अन्न प्रशासन विभागाने बारकाईने लक्ष द्यावे. याचसोबत सरकारनेही याकडे दुर्लक्ष करू नये, असे त्या म्हणाल्या.
मथुरेत गेल्या 48 तासांत वेगवेगळ्या ठिकाणातून विकल्या जाणाऱ्या प्रसादाचे एकूण 13 नमुने गोळा करून प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. श्रीकृष्ण जन्मभूमी, वृंदावनच्या प्रसादाचे नमुने गोवर्धनच्या बांके बिहारी मंदिर आणि दांगटी मंदिराबाहेर असलेल्या दुकानांमधून घेण्यात आले आहेत, अशी माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली आहे.