लातूरमध्ये पावसाचा धुमाकुळ; पिकांचे नुकसान, सोयाबीन गंजी वाहून गेल्या

संततधार पावसामुळे औसा तालुक्यात शेतकर्‍यांच्या सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काढणीस आलेले सोयाबीनचे पीक पाण्यात वाहून गेले.

हवामान अभ्यासक पंजाबराव डक आणि हवामान खात्याने 21 सप्टेंबर पासून मराठवाड्यात पावसाचा अंदाज वर्तविला होता. अंदाज बरोबर ठरत 20 सप्टेंबर पासून औसा शहरासह ग्रामीण भागात पावसाने सुरुवात केली आणि शनिवार, दिनांक 21 सप्टेंबर रोजी सकाळपासूनच औसा शहरासह ग्रामीण भागात मुसळधार पडलेल्या पावसाने हाहाकार माजवला आहे. शनिवारी पडलेल्या पावसामुळे तुंगी परिसरातील शेतकर्‍यांचे शेकडो हेक्टर सोयाबीन पाण्यात बुडाले. तसेच संदिपान बब्रुवान पवार या शेतकर्‍याच्या शेतात काढून ठेवलेल्या सोयाबीनची गंजी ताडपत्रीसह पाण्यात वाहून गेली. तुंगी परिसरात दिवसभर पावसाने धुमाकूळ घातल्याने शेतकरी वर्गाची धावपळ उडाली आहे. बर्‍याच ठिकाणी मृग नक्षत्रात पेरणी केलेले सोयाबीन काढणीस आल्याने आणि आठ ते दहा दिवस पावसाचा अंदाज वर्तवल्यामुळे शेतकरी वर्गात चिंता पसरली आहे.

औसा शहरासह ग्रामीण भागातील वानवडा, तुंगी, बेलकुंड, जवळगा, माळकोंडजी, उजनी, आशिव, नागरसोगा, देवताळा, भादा, भेटा, जायफळ, अंदोरा इत्यादी गावातील शेतकर्‍यांच्या उभ्या असलेल्या सोयाबीन पिकाची मोठ्या प्रमाणात नासधूस झाली असल्याने शेतकरी वर्गात चिंता पसरली आहे.