हिंदुस्थान, अमेरिका यांच्यात सेमीकंडक्टरसाठी लष्करी सहकार्य, क्वाड परिषदेनंतर उभय देशांनी केली घोषणा

हिंदुस्थान आणि अमेरिका यांच्यात लष्करी तंत्रज्ञान सहकार्याने सेमीकंडक्टर चीप संयुक्त प्रकल्पाची उभारणी होणार असल्याचे टिपण क्वाड परिषदेनंतर रविवारी उभय देशांनी जारी केले. राष्ट्रीय सुरक्षा, दूरसंचार तंत्रज्ञान आणि हरित ऊर्जा अनुप्रयोगांसाठी प्रगत सेन्सिंग, दळणवळण आणि पॉवर इलेक्ट्रॉनिक्ससाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अशा नवीन सेमीकंडक्टर फॅब्रिकेशन प्लांटची स्थापना करण्याची घोषणा उभय नेत्यांच्या चर्चेनंतर करण्यात आली.

अमेरिकेच्या लष्कराने भारतासोबत या चीप निर्मितीसाठी तंत्रज्ञान भागीदारी करण्यास सहमती दर्शवण्याची ही पहिलीच वेळ आहे. तत्पूर्वी, वाढते तणाव आणि संघर्षाच्या कालखंडात क्वाड युती जागतिकदृष्टया महत्त्वाची असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विल्मिंग्टन येथे शनिवारी अधोरेखित केले.

बायडेन विसरले मोदींना

क्वाड लीडर्स परिषदेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन भाषण संपवत असताना मोदी यांचे नावच विसरले. आपल्यानंतर कोण बोलणार हे बायडेन यांनी सांगणे अपेक्षित होते. मात्र, मोदींचे नाव विसरल्यामुळे, आता पुढे कोण, कोण आहे पुढचा वक्ता, असेच ते विचारत राहिले. अखेर त्यांच्या एका सहायकाने मोदींकडे हाताचा इशारा केल्यावर मोदी उठून पुढे आले आणि एक विचित्र प्रसंग थोडक्यात संपुष्टात आला.