मध्य प्रदेशात आर्मी ट्रेन डिरेल करण्याचा प्रयत्न, रेल्वे ट्रकवर डिटोनेटर पसरवले

रेल्वे एक्स्प्रेस गाड्या रुळावरून घसरवून घातपात करण्यासाठी अनेक प्रयत्न केले गेले. आता तर चक्क आर्मी ट्रेन डिरेल करण्याचा प्रयत्न मध्य प्रदेशात झाल्याचे उघडकीस आले आहे. आर्मी ट्रेन डीरेल करून मोठा घातपात घडवून आणण्यासाठी रेल्वे रुळावर अक्षरशः स्फोटक डिटोनेटर पसरवले तसेच कानपूरमध्ये पुन्हा एकदा सिलिंडर आढळल्याचे समोर आले आहे. मध्य प्रदेशच्या बुरहानपूर येथून लष्कराच्या जवानांना घेऊन जाणाऱ्या ट्रेनमध्ये स्फोट घडवून आणण्याचा प्रयत्न झाल्याचे 18 सप्टेंबर रोजी उघडकीस आले.

बुरहानपूरच्या नेपानगर येथे रेल्वे ट्रकवर डेटोनेटर पसरवण्यात आले होते. मात्र, ट्रेन त्या ठिकाणी पोहोचण्यापूर्वीच डेटोनेटर फुटले. त्यामुळे रेल्वे अधिकारी सतर्क झाले आणि रेल्वे स्टेशनवरच थांबवली, त्यामुळे मोठी जीवितहानी टळली. तर दुसरीकडे उत्तर प्रदेशच्या कानपूर येथे प्रेमपूर स्टेशनजवळ रेल्वे ट्रकवर एक छोटा सिलिंडर ठेवण्यात आला होता.

जेटीटीएन गुड्स या मालगाडीच्या लोको पायलटने सिलिंडर पाहिला आणि तत्काळ ब्रेक लावून ट्रेन 10 फुटांआधीच थांबवली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. पंजाबच्या बठिंडा येथे रेल्वे रुळावर सळ्यांचे बंडल ठेवण्यात आले होते. लोको पायलटने दुरूनच हे बंडल पाहिल्यानंतर अर्जंट ब्रेक दाबला त्यामुळे दुर्घटना टळली.

बिहारच्या मुजप्फरपूर येथे शनिवारी रात्री मुजप्फरपूर-समस्तीपूर रेल्वे रुळादरम्यान इंजिनची एकूण 6 चाके पटरीवरून उतरली. रेल्वेच्या लोको पायलट आणि पॉइंट मॅनने हलगर्जीपणा केल्याने ही घटना घडल्याचे तपासात समोर आले.